‘प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान’ (पीएमउषा) या केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत दि. १२ ते १४ नोव्हेंबर २०२४ रोजी महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी तीन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. या शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत एम.एस.एफ.डी.ए. (महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकादमी) आणि सिंबॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे या संस्थेतील डॉ. सोफिया गायकवाड, डॉ. अश्विनी वाडेगावकर, डॉ. सुनंदा रॉय, डॉ. महेश शिंदे, श्री. गणेश लोखंडे या तज्ज्ञ साधनव्यक्ती प्राध्यापकांना मार्गदर्शन करणार आहेत.
गोगटे जोगळेकर महाविद्यालय पीएमउषा योजनेस पात्र ठरले आहे. या योजने अंतर्गत उच्च शिक्षणासाठी अनुदान दिले जाते. या योजनेच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट शिक्षकांना अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापनामधील नव्या बदलांसंबंधी व कौशल्यांसंबंधी प्रशिक्षण देणे हे आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापनात झालेले बदल समजून घेऊन त्यानुसार कार्यपद्धती ठरविण्यास हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल. वर्ग अध्यापनात विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग वाढवणाऱ्या पद्धती, कृतीआधारीत अभ्यासपद्धती आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये (२०२०) सुचविलेल्या मूल्यमापनाच्या नाविन्यपूर्ण पद्धती, तसेच या प्रक्रियेत तंत्रज्ञानाची उपयुक्तता या सर्व विषयांबाबत कार्यशाळेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.
या कार्यशाळेतील सत्रे कृतीआधारीत असल्यामुळे प्रवेश मर्यादित आहेत. प्रथम संपर्क करणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. या कार्यशाळेविषयी अधिक माहितीसाठी तसेच सहभागासाठी प्रा. निशा केळकर (मोबा. 9405072376) यांना संपर्क करावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.