gogate-college-autonomous-updated-logo

‘हाती घेतलेल्या कामावर ज्याची निष्ठा, तो लोकमान्य’ – श्रीनिवास पेंडसे

‘हाती घेतलेल्या कामावर ज्याची निष्ठा, तो लोकमान्य’ – श्रीनिवास पेंडसे

समाजाला एकत्र आणण्याचे काम ज्यांनी आपल्या लेखणीतून, विचारातून केले असे अलौकिक व्यक्तिमत्त्व लाभलेले, दीपस्तंभाप्रमाणे अनेकांचे दिशादर्शक व प्रेरणास्त्रोत असलेल्या लोकमान्यांचे विचार आजच्या काळातही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन श्रीनिवास पेंडसे यांनी केले. गोगटे- जोगळेकर महाविद्यालय टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानात त्यांनी आपले विचार मांडले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्यावतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त ‘अलौकिक लोकमान्य टिळक’ या विषयावर श्रीनिवास पेंडसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. लोकमान्य टिळक हे नेहमीच विद्यार्थी दशेत राहण्याबाबत आग्रही होते. विद्यार्थ्यांमध्येच रममाण होण्यात आनंद मानणारे, कर्मयोगी, दूरदृष्टी असणारे, भारतीय संस्कृतीचे प्रचारक, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पत्रकार, हाडाचे शिक्षक अशा अनेक उपाधी असलेले लोकमान्य खऱ्या अर्थाने लोकमान्य होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. देशाच्या उभारणीसाठी माणसे तयार करणे, त्यांचा प्रेरणास्त्रोत बनण्याची अलौकिकता लोकमान्यांकडे होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते कसे टिकेल यासाठी लोकमान्य नेहमीच प्रयत्नशील होते. लोकमान्य टिळकांचे अशा प्रकारचे अलौकिकत्व श्रीनिवास पेंडसे यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील अनेक घटना व व्यक्तींचे संदर्भ देत विद्यार्थ्यांना उलगडून दाखविले. शिक्षणाबरोबरच कौशल्ये विकसित केली पाहिजेत याची बीजे लोकमान्यांच्या विचारात दिसतात, याचा आवर्जून उल्लेख श्रीनिवास पेंडसे यांनी केला.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य पी. पी. कुलकर्णी यांनी बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या लोकमान्य टिळकांचे विचार भावी पिढीला प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. लोकमान्यांच्या कार्याचा, आदर्शाचा आपण सर्वजणांनी वारसा चालवू अशी ग्वाही दिली.

या कार्यक्रमात विशेष पारितोषिके तसेच आदर्श विद्यार्थी पारितोषिक वितरण करण्यात आले. लोकमान्य टिळक पारितोषिक प्रथम वर्ष विज्ञान शाखेच्या शिवम राजन कीर याने प्राप्त केले. कै. प्रभाकर करमरकर गणित पारितोषिक द्वितीय वर्ष विज्ञान शाखेच्या मुस्कान जोहर चिकटे वतृतीय वर्ष विज्ञानशाखेच्या जान्हवी निलेश वैशंपायन यांनी प्राप्त केले. कै. गणेशशास्त्री घाटे पारितोषिक तृतीय वर्ष कला शाखेच्या अपूर्वा अंबादास मुसळे या विद्यार्थिनीने पटकाविले. दरवर्षी महाविद्यालयाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार या दिवशी जाहिर होतो. यंदाचा हा पुरस्कार एन.सी.सी. कॅडेटविद्या विजय टेरवणकर या विद्यार्थिनीने पटकावला. लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयीन गटात प्रथम क्रमांक निधी अतुल बडे, द्वितीय क्रमांक ईशा जयराम सावंत , तृतीय क्रमांक अथर्व संदेश तेंडुलकर व उत्तेजनार्थ क्रमांक श्रावणी विश्वास पवार यांनी प्राप्त केले. तसेच वरिष्ठ महाविद्यालयीन गटात प्रथम क्रमांक मनस्वी नाटेकर, द्वितीय क्रमांक वर्षा काळे, तृतीय क्रमांक ओंकारआठवले व उत्तेजनार्थ क्रमांक (विभागून) कल्पजा जोगळेकर व सेजल मेस्त्री यांनी प्राप्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. तेजश्री भावे यांनी केले. महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Comments are closed.