gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘उडान महोत्सव’ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘उडान महोत्सव’ संपन्न

मुंबई विद्यापीठ मुंबई आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने उडान महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले होते प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी येथे हा महोत्सव संपन्न झाला. विद्यार्थांच्या विविध नैपुण्य गुणांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

आपल्या अध्यक्षिय मार्गदर्शनात प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना विद्यार्थांसाठी शैक्षणिक कार्यकाळ महत्वाचा असून विविध कौशल्य गुणांसोबत सामाजिक भान राखून विद्यार्थांनी कार्य करावे असे मार्गदर्शन केले. नवे राष्ट्रीय शिक्षणिक धोरण व आजीवन अध्ययन विभागाची भूमिका यावर सिनेट सदस्य डॉ. विश्वंभर जाधव यांनी मार्गदर्शन केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी शिक्षणक्रमात आजीवन अध्ययन विभागाचे महत्व व १२ शैक्षणिक क्रेडिट यांची माहिती दिली. सामाजिक उपक्रमात सहभागी होणारा हा विभाग विद्यार्थी गुणांना संधी देणारा असून विद्यार्थांनी विविध स्पर्धांमधून सहभागी होऊन आपले कौशल्य विकसित केले पाहिजे असे मत त्यांनी मांडले.

आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग मुंबई विद्यापीठ समन्वयक डॉ. कुणाल जाधव यांनी ३४८ महाविद्यालयांतून सुमारे ६००० हून अधिक विद्यार्थी या विभागात विविध स्तरावर कार्यरत असल्याचे सांगितले. विविध स्पर्धातील सहभागी व विजेत्या विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे, अधिष्ठाता मानव्यविद्या डॉ. अनिल सिंग, डॉ. माधव लघाटे, डॉ. माधव राजवाडे, डॉ. किशोरी भगत, डॉ. सुनील पाटील, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, उप प्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. चित्रा गोस्वामी, रत्नागिरी शिक्षण संस्था सहसचिव प्रा. श्रीकांत दुदागीकर, आजीवन अध्ययन क्षेत्र समन्वयक डॉ. कांबळे, डॉ. शिवराज गोपाळे,अन्य महाविद्यालयातील सर्व समन्वयक प्राध्यापक व बहुसंख्येने विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते. समाज माध्यमे, निवडणूक साक्षरता, पर्यावरण शिक्षण, महिला सक्षमीकरण,अन्न वाचवा, आरोग्य, भारतीय संविधान अशा विविध विषयांवर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मंडणगड , दापोली, गुहागर, चिपळूण , लांजा, रत्नागिरी , खेड या तालुक्यांतून विद्यार्थी स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते.

महोत्सवातील स्पर्धा नियोजनात आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातील डॉ. अजिंक्य पिलणकर, डॉ. अंबादास रोडगे, प्रा. सूर्यकांत माने यांनी सहभाग घेतला. विविध प्राध्यापक सहकारी यांनी या महोत्सवातील नियोजनात सहकार्य केले. डॉ. अजिंक्य पिलणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने महोत्सवाचे समापन करण्यात आले. अतिशय उत्साहाने सर्व विद्यार्थी स्पर्धक या उडान महोत्सवात सहभागी झाले.

Comments are closed.