गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाततर्फे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती म्हणजे दि. १५ ऑक्टोबर हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. कलाम यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील विशेष अभिरुची लक्षात घेऊन या विषयावर आधारित ‘ग्रंथ प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, संस्कृत विभाग प्रमुख आणि ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. आनंद आंबेकर, प्रा. बाबासाहेब सुतार, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर आणि ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे उपस्थित होते.
त्यानंतर वाचन प्रेरणा दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थी वाचनाला प्रेरणा देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी केले. त्यांनी महाविद्यालयीन ग्रंथालय आणि उपलब्ध वाचन साहित्य तसेच सोयीसुविधा यांची सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले व गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. कलाम हे स्वत:चा ग्रंथसंग्रह जपणारे विद्वान असल्याचा उल्लेख करून त्यांनी वाचनाचे महत्व विविध उदाहरणांचा दाखला देत विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यांनी रतन टाटा यांच्या वाचनविषयक गोष्टींचीही चर्चा केली. ज्ञानाच्या विविध क्षेत्रांची सफर करत असताना आपल्याला विविध विषयांची पुस्तकेच आधार देतात. विद्यार्थी जीवन हे ज्ञान संपादन करण्यासाठी खूपच पूरक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आजचा दिवस हा वाचन चळवळ पुढे नेण्यासाठी विशेष अशाप्रकारचा आहे; असे मत त्यांनी व्यक्त केले. मी स्वत: या ग्रंथालयामध्ये अभ्यास करून आपल्यासमोर उभा असल्याचेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. उपस्थित सर्वांना त्यांनी ‘वाचन प्रेरणा दिनाच्या’ शुभेच्छा दिल्या.
‘वाचन आणि व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर महाविद्यालयातील परफॉर्मिंग आर्ट्स विभागाचे प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाचन साहित्याची निवड करणे, नेमके काय आणि कसे वाचावे याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी महाविद्याल्यिंग जीवनात व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी वाचनाला पर्याय नाही असे विषद केले. डीजीटल युगात वाचन करणे जास्त आव्हानात्मक झाले आहे. डीजिटल माहितीबरोबरच आपल्याला एखादे आवडते पुस्तक फावल्या वेळात वाचण्याची सवय लावून ठेतली पाहिजे. आपले आवडते पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा आनंद अवर्णनीय असा असतो; याची प्रचीती सर्वांनी घेतलेली आहे. चांगले वाचणे, त्याच्या नोंदी ठेवणे आणि वेळोवेळी त्या नोंदी पाहणे ही प्रक्रिया खुप महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. डिजिटल वाचनापेक्षा फिजिकल पुस्तक वाचणे कधीही आनंददायी असते. आपली विचार क्षमता वृध्दिंगत होण्यासाठी वाचनाला पर्याय नाही असे सांगितले. अष्टपैलू वाचन आपले व्यक्तिमत्व निश्चितच अष्टपैलू करते असा विश्वात त्यांनी शेवटी व्यक्त केला.
यानंतर ‘ग्रंथ अभिवाचन कार्यक्रम’ झाला. यामध्ये ग्रंथालयाच्या ‘वाचक गटाचे’ विद्यार्थी सहभागी झाले होते.डॉ. कलाम यांचे अग्निपंख या ग्रंथाचे अभिवाचन ओंकार आठवले; जे.आर.डी. टाटा यांची पत्रे या ग्रंथाचे चैतन्य पटवर्धन; कथारंग या ग्रंथाचे वृषाली कोवळे; इनर मॅजिक या ग्रंथाचे सिद्धी साखळकर; पिंजऱ्यातले सुख या ग्रंथाचे पायाल जाधव; ज्याचा त्याचा परिघ या ग्रंथाचे वैष्णवी श्रीनाथ आणि प्राचीन भारताचा इतिहास या ग्रंथाचे चारुदत्त भडसावळे याने अभिवाचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचक गटाचा विद्यार्थी ओंकार आठवले याने तर आभारप्रदर्शन सहा. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.