गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १५ ऑक्टोबर हा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती दिवस म्हणजे ‘वाचन प्रेरणा दिन’ विविध वाचनविषयक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सरस्वती आणि डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात विविध विषयांवरील ग्रंथ, संदर्भ साहित्य, टॉकिंग बुक्स, ई-बुक्स, नियतकालिके इ. वाचनसाहित्याचा समावेश असलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी ‘डॉ. कलाम यांचा विद्यार्थी ते थोर शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती ते भारतरत्न असा प्रवास केवळ थक्क करणारा आहे. आपण यातून प्रेरणा घेऊन त्यांचे काही गुण आत्मसात करू शकतो. आपला देश सर्व क्षेत्रात पुढे जावा याविषयी सतत विचार करणारे आणि विद्यार्थ्यांमध्ये रमणारे असे डॉ. कलाम होते.’ हे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करून अभ्यासाव्यतिरिक्त आपल्या आवडत्या विषयाचे वाचन नियमित करावे असे आवाहन केले.
त्यानंतर कै. डॉ. ज. शं. केळकर सेमिनार येथे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात डॉ. कलाम यांच्या ‘प्रज्ज्वलित मने’ या पुस्तकाचे परीक्षण आणि त्यातील काही लेखांचे अभिवाचन करण्यात आले. याशिवाय वाचक गट, वाङ्मय मंडळ, पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी वाचनीय आणि लोकप्रिय पुस्तकांचे परीक्षण सादर केले. या कार्यक्रमाला व्यासपीठावर प्रमुख पाहुणे श्री. राजेंद्रप्रसाद मसुरकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. मंगल पटवर्धन, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य विवेक भिडे, इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. रमेश कांबळे, मराठी विभागप्रमुख शिवराज गोपाळे, डॉ. निधी पटवर्धन, प्रा. भोसले तसेच प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे श्री. राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचे ग्रंथभेट आणि गुलाबपुष्प देऊन तसेच इतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मंगल पटवर्धन यांनी केले. त्यांनी श्री. राजेंद्रप्रसाद मसुरकर यांच्या व्यक्तिमत्वातील लेखक, शिक्षक, पत्रकार, संपादक, मोटार जगतचे निर्माते, मोटार जगतातील तज्ज्ञ आणि उत्तम वक्ते असे विविध पैलू उलगडून दाखविले. त्यांच्या महाविद्यालयातील कारकीर्दीचा आढावा घेतला. आज लेखक आपल्या भेटीला असा योग जुळून आल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी याप्रसंगी श्री. मसुरकर यांनी लिहिलेल्या प्रमुख पुस्तकांचाही आढावा घेतला.
प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्री. राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी आपल्याला या महाविद्यालयातील ४० वर्षांपूर्वीची आपली विद्यार्थीदशा आठवते अशी सुरुवात करून आपल्या आजपर्यंतच्या वाटचालीत वाचनाने आणि महाविद्यालीयीन ग्रंथालयाने खूप आधार दिल्याचे नमूद केले. वाचन ही सवय आनंदी होण्यासाठी काय काय करता येईल याचे अनेक दाखले त्यांनी दिले. केवळ वाचनाने अनेक व्यक्तिमत्वे कशी घडली याची उदाहरणे त्यांनी दिली. तसेच बदलत्या काळातील वाचनाचे स्वरूप कसे बदलत जात आहे याचीही उदाहरणे दिली. त्यांनी मोबाईलचा वापर अनेक चांगल्या गोष्टींसाठी कसा करता येऊ शकतो हे विषद केले. विषयाचे बंधन न ठेवता वाचन करावे आणि आपला वैयक्तिक ग्रंथसंग्रह जरूर असावा तसेच भरपूर पुस्तकांच्या सानिद्ध्यात तुम्हाला हरवून जाता आले पाहिजे; मग तुम्ही नक्की विद्वान व्हाल आणि आपला प्रभाव निर्माण कराल असे ते म्हणाले. महाविद्यालयीन ग्रंथालय हे एक उत्तम ग्रंथालय असून तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी येथील उपलब्ध सेवा-सुविधांचा लाभ घेतला पाहिजे अशी इच्छा प्रकट केली. आपल्या मनोगताची सांगता करताना ‘या ग्रंथालयाशी माझे ऋणानुबंध असल्याने मला आज या उत्तम कार्यक्रमासाठी निमंत्रित करून माझा कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाने बहुमान केल्याचे’ ते अत्यंत नम्रतापूर्वक म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी डॉ. कलाम यांनी अत्यंत गरीबीवर मात करत आपला जीवनप्रवास कसा केला आणि त्यासाठी त्यांनी विविध क्षेत्रात कसे परिश्रम घेतले याचे दाखले देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आपल्या वाटचालीसाठी ‘अग्निपंख’ हे डॉ. कलाम यांचे चरित्र जरूर वाचावे असे आवाहन केले.
यानंतर डॉ. अब्दुल कलाम यांच्या ‘प्रज्ज्वलित मने’ या पुस्तकाचे परीक्षण आणि त्यातील निवडक लेखांचे अभिवाचन विद्यार्थ्यांनी केले. कु. अर्पिता विकास केळकर हिने परीक्षण तर कु. स्नेहल गराटे, कु. शुभराणी होरंबे आणि कु. शाहिन हीटनळी यांनी निवडक लेखांचे अभिवाचन केले. यानंतर शिवाजी सावंत लिखित युगंधर, व्यंकटेश माडगुळकर लिखित बनगरवाडी, नयना सहस्रबुद्धे लिखित स्त्रीभान, मिलिंद बोकील लिखित गांधी, विनोबा आणि जयप्रकाश, नसरीन कबीर लिखित झाकीर हुसैन-अ लाइफ इन म्युझिक आणि मनोज बोरगावकर लिखित नदिष्ट या प्रसिद्ध पुस्तकांचे परीक्षण सादर केले. सदर परीक्षण अनुक्रमे निवेदिता कोपरकर, सिद्धी साळवी, आदिती कार्लेकर, गौरी भटसाळसकर, प्रसन्न खानविलकर आणि साक्षी पंडित या विद्यार्थ्यांनी केले. या उपक्रमात वाचक गट आणि वाङ्मय मंडळातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
अशाप्रकारे कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ हा दिवस लेखक आपल्या भेटीला, सामुहिक वाचन, ग्रंथ अभिवाचन आणि ग्रंथ परीक्षण अशा विविधरंगी तसेच भरगच्च कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन श्री. उत्पल वाकडे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयीन प्राध्यापक, ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.