gogate-college-autonomous-updated-logo

भिडे गुरुजी यांची गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला सदिच्छा भेट

महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख संभाजी भिडे यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.

शिवप्रतिष्ठान ही एक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. त्याची स्थापना श्री. संभाजी भिडे यांनी केली असून, ते ‘भिडे गुरुजी’ या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते श्री. संभाजी भिडे यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी केले. आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून डॉ. कुलकर्णी यांनी संभाजी भिडे यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भिडे गुरुजी म्हणाले, नैतिकता हा समकाळात महत्वाचा कळीचा मुद्दा बनला आहे. स्त्रिया भारतमातेचे एक मूर्तिमंत प्रतिक, रूप असून, आपण सर्वांनी स्त्रियांचा सन्मान, आदर केला पाहिजे. स्त्रियांकडे पवित्रतेच्या दृष्टीतुन पाहण्याची भावना जोपासली पाहिजे. तसेच अभ्यासक्रमात संस्कृत भाषा आणि मराठा साम्राज्याचा इतिहास शिकणे आवश्यक असून, भारत देशाला राष्ट्र म्हणून टिकायचे असेल तर या दोन्ही गोष्टींची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या, एखादा माणूस आपले वय, प्रकृती इ. चा विचार न करता अत्यंत निग्रहाने किती काम करतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे मामा म्हणजेच भिडे गुरुजी हे आहेत. तरुणांना व्यायामाची सवय लागावी, त्यांच्यात व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणून दररोज सकाळी सांगलीच्या घाटावर जाऊन १०८ सूर्यनमस्कार घालताना मी गुरुजींना पाहिले आहे. कोणतीही गोष्ट आपल्याला येत नाही म्हणून ती करणे सोडून द्यायची नाही. ती गोष्ट येईपर्यंत सतत प्रयत्न करत राहायचे हे मी लहानपणापासून माझ्या कुटुंबाकडून शिकत आले आहे. आपण सर्वांनीही प्रयत्नपूर्वक काही गोष्टी शिकल्या पाहिजे,असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, संस्थेचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. चिंतामणी दामले, तिन्ही शाखेच्या उपप्राचार्या, विभागप्रमुख, प्राध्यापक-अध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Comments are closed.