मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांनी नुकतीच गोगटे जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी उपाध्यक्ष डॉ. विवेक पाटकर, कार्यवाह श्री. दिलीप हेर्लेकर, विज्ञान पत्रिकेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. राजीव चिटणीस उपस्थित होते.
मराठी विज्ञान परिषद ही एक नामवंत बिगर सरकारी संस्था असून समाज व विद्यार्थी यामध्ये विज्ञान प्रचार व प्रसारचे कार्य गेली ५५ वर्षे करीत आहे. संस्थेचे ७६ विभाग विविध राज्यांमध्ये विज्ञान प्रसारासाठी कार्यरत असून गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विज्ञान परिषद विभाग १९७५ पासून कार्यक्षमपणे नरंतर विज्ञान प्रसाराचे कार्य करीत आहे.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने विज्ञान संशोधन प्रकल्प, विज्ञान एकांकिका, शिक्षक-विद्यार्थी प्रशिक्षण, निबंध स्पर्धा, विज्ञान व्याख्याने, शास्त्रीय उपकरण व त्यांची माहिती, गणित कार्यशाळा, शास्त्रज्ञ आपल्या भेटीला इ. उपक्रमांमधील सहभाग व नैपुण्य या सर्वाचे डॉ. जोशी आणि सहकाऱ्यांनी कौतुक केले व आपला अभिप्राय नोंदवला.
भविष्यातील योजना व कार्य यासंदर्भात प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचेशी चर्चा करून नियोजन केले आणि विभागाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
या भेटीदरम्यान मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी विभाग समन्वयक डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, कार्यवाह डॉ. उमेश संकपाळ, खजिनदार डॉ. सोनाली कदम, महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाचे उपप्राचार्य विवेक भिडे, प्रध्यावाक आणि विद्यार्थी उपस्थित होते.