आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदारांमध्ये ईव्हिएम आणि व्हीव्हीपॅट मशीनसंबंधी जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या आदर्श मतदान केंद्रास गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली आणि अभिरूप मतदानाच्या माध्यमातून मतदानाची रंगीत तालीम केली.
सध्या नवमतदारांची संख्या वाढत असून, त्यांच्यात मतदान प्रक्रियेविषयी जनजागृती व्हावी, मतदारांचा मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त सहभाग वाढावा, या प्रमुख हेतूने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांमध्ये मतदानप्रक्रियेविषयी अधिकाधिक जनजागृती व्हावी, मतदान प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा या हेतूने स्वीप अंमलबजावणी समिती, रत्नागिरी यांच्यावतीने जिल्हा परिषदेच्या आवारात आदर्श मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या आदर्श मतदान केंद्रास महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी नुकतीच भेट दिली.
याप्रसंगी तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी नवमतदार विद्यार्थ्यांना ईव्हिएम आणि व्हीव्हीपॅट मशीनसंबंधी प्रात्यक्षिक दाखवून त्यांच्याकडून अभिरूप मतदान करवून घेतले. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी प्रश्नोनोत्तरांच्या माध्यमातून प्रशिक्षण देणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधून ईव्हिएम आणि व्हीव्हीपॅट मशीन, मतदान प्रक्रिया याविषयी माहिती घेतली.
या क्षेत्रभेटीत विभागातील ३४ विद्यार्थी सहभागी झाले आणि समन्वयक म्हणून राज्यशास्त्र विभागाचे प्रा. निलेश पाटील यांनी काम पहिले. याकामी त्यांना उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, मतदार साक्षरता क्लबचे समन्वयक प्रा. तुळशीदास रोकडे व प्रा. सचिन सनगरे यांनी मोलाचे सहकार्य केले. क्षेत्रभेटीच्या नियोजनात प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.