“तुमच्यामध्ये कौशल्य असेल तर इंडस्ट्रीत व्यवसाय संधी अमाप उपलब्ध आहेत मात्र कठोर परिश्रमांची तयारी ठेवा.” असे उद्गार महाविद्यालयातील फिल्म क्लब आयोजित ‘वेबसिरीज निर्मिती व्यवसाय व संधी’ या दोन दिवसीय कार्यशाळेत प्रसिद्ध दिग्दर्शक श्री. विनय वायकुळ यांनी मार्गदर्शन करताना काढले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना भविष्यकालीन करिअरसाठी विविध संधींची माहिती व्हावी यासाठी नवनवीन उपक्रमाचे आयोजन केले जात असते. ‘वेबसिरीज’ या कला व मनोरंजन क्षेत्रात कोणत्या संधी आहेत व या क्षेत्रात येण्यासाठी कोणती पूर्वतयारी लागते या आणि अशा अनेक प्रश्नांवर ‘आरण्यक’ आणि ‘द ब्रोकन न्यूज’ या प्रसिद्ध वेब सिरीजचे दिग्दर्शक श्री. विनय वायकुळ यांनी मार्गदर्शन केले. वेबसिरीज निर्मिती, पूर्वतयारी, प्रदर्शनाचे व्यासपीठ, लेखक, दिग्दर्शक आणि अन्य तांत्रिक बाजू सांभाळणारी व्यक्ती म्हणून संधी, आर्थिक ताळेबंद, मिळणारे मानधन आणि सुविधा, निर्माते, व्यावसायिक भागीदार, अभिनय, वेशभूषा, चित्रीकरण, संपादन या अनुषंगाने असणारी व्यावसायिक उपलब्धी आणि आव्हाने या विषयी सविस्तर व स्वानुभवावर आधारित मार्गदर्शन त्यांनी केले. डॉ. निधी पटवर्धन यांनी मुलाखत आधारित प्रश्नोत्तरातून हा कार्यक्रम अधिक नियोजनबद्ध करून विद्यार्थाच्या मनातील शंकांचे निरसन करण्यास मदत केली. विद्यार्थांच्या सहभागातून कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. मनोरंजन क्षेत्राचे बदलते पैलू व आधुनिक तंत्राचे व्यापक क्षेत्र यातून विद्यार्थांना रोजगारक्षम बनविण्यास अनेकविध संधींची निर्मिती होत असताना या प्रकारचा उपक्रम मार्गदर्शक ठरला. विद्यार्थांचे प्रश्न व प्रतिक्रिया यामुळे हा उपक्रम अधिक कृतिशील झाला.
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, फिल्म क्लब समन्वयक डॉ. निधी पटवर्धन, सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी प्रतिनिधी व वेबसिरीज या कला व मनोरंजन क्षेत्राशी संबंधित विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.