गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या लोकमान्य टिळक पदव्युत्तर पदवी विभागामार्फत कला शाखेतील पदव्युत्तर पदवीकरिता प्रवेशित विद्यार्थ्याचा स्वागत समारोह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध सोई-सुविधांची माहिती होऊन त्यांनी विद्यार्थीदशेतच विविध संशोधनासाठी प्रवृत्त व्हावे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. विभागाचे समन्वयक डॉ. शाहू मधाळे यांनी प्रास्ताविक करताना विद्यार्थ्यांना विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे यांनी महाविद्यातील सहअभ्यासेतर उपक्रमांची माहिती देत स्वयंअध्ययनाकडे वळण्याचा संदेश दिला. ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाविषयी विस्तृत माहिती देताना ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करून आपण आपले व्यक्तिमत्व कसे प्रभावी बनवू शकतो याविषयी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी आपल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेची माहिती देत विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांच्या वाढीसाठी महाविद्यालय कसे प्रयत्नशील आहे याचे दाखले दिले. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ई विविध उपक्रमांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘गोजो-कनेक्ट’ या अॅपची माहिती दिली. तसेच पदव्युत्तर पदवी हा जीवनातील महत्वपूर्ण टप्पा असून या काळात आपण आपले व्यक्तिमत्व, शैक्षणिक उच्चत्व आणि समाजातील लोकांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे सांगून त्यासाठी महाविद्यालय सर्व सोई-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते त्याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी उत्तुंग विकास साध्य करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. कृष्णात खांडेकर यांनी केले. या कार्याक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.