‘आजही भारतीय समाजात महिलांच्या समस्यांविषयी उदासीनता दिसून येते, ही अत्यंत खेदाची बाब आहे. समाजात खोलवर रुजलेल्या पितृसत्ताक संस्कृतीमुळे महिलांचे शारिरीक आणि मानसिक शोषण होत आहे. जर महिलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर समाजाची पुरुषप्रधान मानसिकता बदलणे गरजचे आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. रमेश कांगणे यांनी केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित महिला सक्षमीकरण विषयक एकदिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीने महिलांचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर खच्चीकरण केले की आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीवच स्त्रियांना राहिलेली नाही. त्यामुळेच तालुकास्तरावर कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागते ही अत्यंत खेदाची बाब आहे. यावेळी त्यांनी समाजात आणि विशेषतः कोकणात स्त्रियांवरील होणाऱ्या अन्यायाचे विदारक सत्य मांडले. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच पिडीत महिलांच्या पुनर्वसनासाठी शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचीही माहिती त्यांनी सविस्तरपणे दिली. आणि रत्नागिरी शहर परिसरात शासनाच्या मदतीने नोकरी करणाऱ्या स्त्रियांकरिता वसतिगृह बांधण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात महिला विकास कक्ष अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावरील एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, नियामक मंडळाच्या सदस्या व रत्नागिरीतील ख्यातमाम डॉक्टर कल्पना मेहता, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. रमेश कांगणे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी, अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा प्रा. बीना कळंबटे, उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. किशोर सुखटणकर यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण नैपुण्याचा विचार करता यामद्धे विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळावरही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थीनी कार्यरत आहेत. ही बाबा लक्षात घेऊन उपलब्ध व्यासपीठावर विद्यार्थिनींना पुढे जाण्यासाठी अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील आहे.
डॉ. कल्पना मेहता आपले मनोगत व्यक्त करताना ‘स्त्री सक्षमीकरण म्हणजे पुरुषांना विरोध नव्हे, तर पुरुषांच्या बरोबर केलेली वाटचाल होय’ यामध्ये स्वत:च्या सबलीकरणाचे स्वातंत्र्य हे स्त्रीला असलेच पाहिजे, मात्र आपली समाज रचना आणि परंपरेच्या चौकटी लक्षात घेता तरुणींनी आपल्या आयुष्याकडे व भविष्याकडे गांभीर्याने पाहणे गरजचे आहे, असे नमुद केले.
कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी चर्चासत्राचा अध्यक्षीय समारोप करताना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या एका अहवालाचा दाखला देत त्या म्हणाल्या, की जगातील ७० ते ७२ टक्के काम हे महिला करतात. मात्र जगातील केवळ एक टक्का जमीन त्यांच्या मालकीची आहे. स्वत: केलेल्या कामाचे योग्य मूल्य कधिच स्त्रियांना प्राप्त होत नाही. त्यामुळे महिलांना स्वत:चा शोध घेण्याची आणि स्वत:चे सामर्थ्य समजून घेण्याची आवश्यकता आहे. आपल्याला जे हवं आहे ते आपण स्वत:च प्राप्त करून घ्यायचं आहे ही जिद्द मनात ठेऊन महिलांनी अन्यायाचा प्रतिकार करावा आणि इतरांवरही अन्याय होणार नाही यांची काळजी घ्यावी. याप्रसंगी त्यांनी आपल्या सामाजिक व राजकीय जीवनातील अनुभवांना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आरती पोटफोडे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या सत्कारासाठी ‘अविष्कार’ येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचा वापर करून महाविद्यालयाने आपले सामाजी भानही जपले. या चर्चासत्रामद्धे रत्नागिरी परिसरातील स्त्रीविषयक काम करणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधी, शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला.