gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्वयंरोजगाराच्या नव्या दिशा’ कार्यक्रमाचे आयोजन

आर्थिक स्वायत्तता हा महिला सबलीकरणातील सर्वात महत्वाच्या घटक आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यार्थिनीनी पारंपारिक ज्ञानाबरोबर व्यवसायासाठी लागणारी कौशल्ये आत्मसात करून स्वयंरोजगाराची कास धरावी आणि उद्योगिनी म्हणून स्वत:ला प्रस्थापित करावे असे उद्गार ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’च्या संस्थापक मीनल मोहाडीकर यांनी काढले. निमित्त होते गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे आयोजित कार्यक्रमाचे.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. ८ मार्च २०२१ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा महिला विकास कक्ष आणि आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वयंरोजगाराच्या नव्या दिशा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, आम्ही उद्योगिनी, रत्नागिरीशाखेच्या प्रमुख श्रीमती अदिती देसाई, वृक्षवल्ली नर्सरी उद्योग चालवणाऱ्या श्रीमती माधुरी कळंबटे आणि महिला विकास कक्ष समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी उपस्थित होते. या कार्यक्रमाला श्रीमती मीनल मोहाडीकर यांनी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना श्रीमती अदिती देसाई यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक जिद्द, चिकाटी आणि मेहनत हे गुण महिलांमध्ये नैसर्गिकरीत्या असतात त्याला फक्त आत्मविश्वासाची जोड दिली तर तुम्ही देखील यशस्वी उद्योगिनी होऊ शकता असा विश्वास व्यक्त केला.

श्रीमती माधुरी कळंबटे यांनी घरच्या घरी लहान फुलझाडे, भाजीपाला लागवड कशा पद्धतीने करावी यासबंधी मार्गदर्शन केले. बागकाम क्षेत्रातील अनेक रोजगारांच्या संधीबद्दल त्यांनी यावेळी माहिती दिली. मुंबईतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून नर्सरीच्या व्यवसायात जम बसवताना आलेले अनुभव घेतलेली मेहनत त्यांनी विद्यार्थिनींसमोर मांडली.

विद्यार्थी विद्यार्थिनीना स्वयंरोजगाराचा मार्ग निवडण्यासाठी प्रेरित करणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी महिला विकास कक्षाचे अभिनंदन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन प्रा. हर्षदा पटवर्धन यांनी केले. ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने विद्यार्थी विद्यार्थिनीना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले.

Comments are closed.