महिला दिनाच्या निमित्ताने गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी पंचायत समितीचा शिक्षण विभाग, रत्नागिरी तहसीलदार कार्यालय आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री मतदार जागृती अभियानाच्या अंतर्गत विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी रत्नागिरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रेय सोपनूर, नायब तहसीलदार मा. दीप्ती देसाई, पंचायत समितीच्या विषयतज्ज्ञ सौ. अश्विनी काणे आणि तहसीलदार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सौ. संजीवनी गोरे उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार जनजागृती व्हावी आणि अधिकाधिक नोंदणी व्हावी यासाठी नायब तहसीलदार मा. दीप्ती देसाई यांनी मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रेय सोपनूर यांनी मतदार नोंदणीची आवश्यकता विशद केली आणि नोंदणीसाठी आवाहन केले. कार्यक्रमात नवीन मतदार नोंदणी अर्ज नमुना ६ चे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले.
महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांसाठी गटचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. ‘सामाजिक प्रसारमाध्यमे आणि आपण’ या विषयावरील यां चर्चेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांनी उत्साहाने सहभाग घेतला. पदव्युत्तर विभागातील श्री. विजय बिळूर, हिमानी कुलकर्णी , सिद्धी वळंजू , सोनल कांबळे, प्रफुल्ल इंदुलकर , विशाखा कदम, ओंकार मुळ्ये या विद्यार्थ्यांनी आपली मते अत्यंत स्पष्टपणे मांडली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उमा जोशी यांनी केले.