दिनांक 11 फेब्रुवारी हा दिवस जागतिक स्तरावर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महिला दिन म्हणून साजरा केला जातो. यामध्ये प्रामुख्याने महिला व विद्यार्थीनी यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानचे महत्व सर्वांना ज्ञात व्हावे व इतर महिलांना यातून प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रयत्न केले जातात. युनेस्कोच्या. अहवालानुसार अजूनही विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कार्यरत असणार्या महिलांचे प्रमाण हे फक्त 35 टक्केपर्यंत मर्यादित आहे. या निमित्ताने ज्या महिलांनी. अमुल्य असे योगदान देऊन आणि अविरत अशा अडचणींचा सामना करून. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राला विविध संशोधनरूपी कोंदणें प्राप्त केले आहेत त्यांना मानवंदना म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
महाविद्यालयात प्रथमच विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या, डॉक्टर अपर्णा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून, प्राचार्यांच्या पुढाकाराने आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा माननीय शिल्पाताई पटवर्धन यांच्या अधिपत्याखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी विज्ञान शाखेतील सर्व महिला प्राध्यापिका सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमादरम्यान प्राध्यापिकाना संबोधित करताना शिल्पाताईंनी. विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेतील त्यांच्या कार्याबद्दल व महिलांच्या एकूण योगदानाबद्दल माहिती दिली तसेच विज्ञान क्षेत्रातील कोणतेही कार्य करण्यास इच्छुक असणाऱ्या प्राध्यापिकेने आपली संकल्पना मांडली तर त्यांना पूर्ण सहकार्य देण्याचीही तयारी दर्शवली. प्रापंचिक अडचणीना तोंड देतही आपल्याला सुंदर असे कार्य करता येते आणि ती शक्ती महिलांमध्ये नक्कीच आहे, फक्त आपण प्रत्येकाने ती ओळखली पाहिजे आणि तीची जाणीव होऊन आपण त्या शक्तीचा पुरेपूर वापर केला पाहिजे, असेही त्यांनी या कार्यक्रमा दरम्यान सांगितले. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपला शिक्षणापासून ते विज्ञान शाखेचे उपप्राचार्य व एक पीएचडी गाईड म्हणून झालेला प्रवास मांडला. महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त महिला सक्रियतेने कार्यरत असून त्या यशाची उत्तुंग शिखरे सर करत आहे. त्याप्रीत्यर्थ सर्वांचे त्यांनी अभिनंदन देखील केले. व त्या दरम्यान आलेल्या विविध अनुभवांचे देखील त्यांनी मांडणी केली. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी हेदेखील उपस्थित होते. त्यांनी सर्व प्राध्यापिकाना संबोधित करताना महाविद्यालयांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला. कार्यरत आहेत आणि त्यांच्यापैकी काही प्रोफेसर, पीएच डी गाइड, विभागप्रमुख, उपप्राचार्य अशी एकेक शिखर पादाक्रांत करत आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन प्रत्येकीने आपले योगदान हे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राला दिले पाहिजे असे सांगितले. या कार्यक्रमादरम्यान वरिष्ठ महिला प्राध्यापिका डॉक्टर मधुरा मुकादम, डॉ. सोनाली कदम डॉ. वर्षा घड्याळे यांनी देखील आपल्या शिक्षण ते पीएचडीपर्यंतचा व त्यापुढील प्रवासाचे वर्णन करून सर्व प्राध्यापिकाना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा दिल्या. तसेच भौतिकशास्त्र विभागातील प्रा. निशा केळकर यांनी त्यांचा संशोधन प्रवास मांडताना संस्था व महाविद्यालयाचे त्यासाठी मोलाचे श्रेय आहे हे नमूद केले या कार्यक्रमास महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाची माजी विद्यार्थिनी सिद्धी महाजन देखील उपस्थित होती. त्यांनी आपले भौतिकशास्त्र शिक्षण, त्यानंतर पत्रकारितेची आवड जपत लोकसत्ता चतुरंग मध्ये त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महिला याबद्दलचे लेखन याचा अनुभव कथन केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका तेजश्री भावे यांनी केले.