गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात एम. ए., एम. कॉम आणि एम.एस्सी. या वर्गांतील विद्यार्थ्यांकरिता ‘ऑनलाइन डेटाबेस’ माहितीविषयक कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अभ्यास, उपक्रम आणि संशोधन या कामांकरिता विविधप्रकारच्या ऑनलाइन स्वरूपाच्या डेटाबेसची गरज असते. महाविद्यालयीन ग्रंथालयात अशा दर्जेदार ‘ऑनलाइन डेटाबेस’ची उपलब्धता असून अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी याचा नियमितपणे उपयोग करून घेत असतात.
‘डेलनेट’ या महत्वाच्या ई-बुक्स आणि ई-जर्नल्स पुरविणाऱ्या डेटाबेसविषयी सविस्तर माहिती या कार्यशाळेदरम्यान विदार्थ्यांना करून देण्यात आली. विविध विषयांचे हजारो ग्रंथ याठिकाणी डेटाबेसवर उपलब्ध आहेत. त्यांचा शोध कसा घ्यावा, डाऊनलोड कसे करावे, लिंक डाऊनलोड कशाप्रकारे कराव्यात, नियतकालिके प्राप्त करणे इ. बाबत सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेण्यात आली. त्याचप्रमाणे ‘डेलनेट’ची ‘इंटर लायब्ररी लोन’ ही सुविधा समजावून देण्यात आली.
सदर कार्यशाळा यशस्वी होण्याकरिता ग्रंथपाल प्रा. किरण धांडोरे, सहाय्यक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र यादव आणि श्री. संतोष जाधव यांनी मेहनत घेतली. या कार्यशाळेकरिता एम. ए., एम. कॉम. आणि एम.एस्सी. या वर्गांतील विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. ग्रंथालयातर्फे अशाप्रकारच्या विद्यार्थी उद्भोधन कार्यशाळांचे नियमितपणे आयोजन केले जाते.