रत्नागिरी गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये दि. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान (पीएमउषा) अंतर्गत अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट संदर्भात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. सरकारतर्फे अशा कार्यशाळेतून राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीबद्दल विविध आस्थापनांमध्ये जागृती करण्यात येत आहे.
सदर कार्यशाळा दोन सत्रांमध्ये घेण्यात आली. प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक श्री. अमोल सहस्रबुद्धे यांनी केले. प्रथम सत्रात श्री. अभिनव शर्मा, क्षेत्रीय समन्वयक, अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट, माजी यूजीसी अधिकारी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी किंवा शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. भारत सरकारच्या डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन कडून राबविण्यात येणाऱ्या विविध दीर्घकालीन उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, डीजीलॉकर, एबीसी आयडी आणि एपीएएआर आयडी या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या प्रवेश पोर्टल विषयी मार्गदर्शन केले. या सर्व माध्यमांद्वारे उच्च शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर विद्यार्थ्यांना मिळणारे क्रेडिट संकलित केले जाणार आहेत. भारतात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार कार्ड प्रमाणेच 12 अंक असणारे युनिक नंबरचे एबीसीडी कार्ड मिळणार आहे. त्यामध्ये क्यूआर कोड असून तो स्कॅन केल्यानंतर विविध विषयात मिळालेले क्रेडिट विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत. यापुढे विद्यार्थ्यांना पाहिजे त्यावेळी, कोणत्याही ठिकाणी आपले क्रेडिट दाखवता येणार आहेत आणि त्यासाठी पारंपारिक गुणपत्रिकेची गरज असणार नाही. ही सुविधा डीजी लॉकर च्या रूपात उपलब्ध होणार आहे, असे श्री. शर्मा यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. एबीसी आय डी कसा महत्त्वाचा आहे, तो कसा तयार करावा आणि त्याचा वापर कसा करावा हे देखील समजावून सांगितले. APAAR ID (Automated Permanent Academic Account Registry) म्हणजेच एका देशात एका विद्यार्थ्यासाठी एकच आयडी असेल असे लक्षात आणून दिले.
दुसऱ्या सत्रात श्री. अभिषेक डेब, महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली, राज्य समन्वयक यांनी ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी मध्ये आस्थापनांनी नोंदणी कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच माहिती भरण्याच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर सांगितले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६६ शिक्षक व विद्यार्थ्यांनी सदर कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदवला.
यावेळी पीएमउषा समन्वयक शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम आणि महाविद्यालयाचे परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. मेघना म्हादये यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी कार्यशाळा सुरळीत पार पडल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.