गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘शिक्षक गुणवत्ता आणि प्रशिक्षण समिती’ अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व अशासकीय महाविद्यालयीन शिक्षेकेतर कर्मचारी संघटना यांच्यातर्फे कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी दि. २५ व २६ फेब्रुवारी २०२० रोजी “कार्यालयीन कागदपत्रांच व्यवस्थापन आणि देखभाल” ह्या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले गेले.
सदर कार्यशाळेसाठी डी.बी.जे. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. श्याम जोशी व यश कन्सल्टिंग सर्विसेसचे श्री. ओंकार पत्की यांनी प्रशिक्षक म्हणून काम पहिले. डॉ. श्याम जोशी यांनी कार्यालयीन कर्मचारी वर्ग हा महाविद्यालयाचा कणा आणि चेहरा असतो अस मत व्यक्त केले. त्यांनी कागदपत्रे कशी तयार करावीत इथपासून ती जतन कशी करावीत, प्रत्येक कागदाची वैधता काय असावी ती कोणी ठरवावी या विषयी मार्गदर्शन केले. दुसऱ्यादिवशी श्री. ओंकार पत्की यांनी कागदपत्रांचे वर्गीकरण कसे करावे, कागदपत्रे हाताळण्यासंदर्भात शासनाचे निर्णय, त्याचप्रमाणे ISO मानांकनासाठी कागदपत्रे कोणत्या स्वरुपात असावीत याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर ह्यांनी मार्गदर्शन केले. तसेच पाहुण्यांचे स्वागत शिक्षक गुणवत्ता आणि प्रशिक्षण समितीचे समन्वयक डॉ. महेश बेळेकर यांनी केले. या कार्यशाळेमध्ये एकूण १५ कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही कार्यशाळा उत्तमरीत्या पार पडली. डॉ. जोशी आणि श्री. पत्की यांचे मार्गदर्शन व अनुभव याचा उपयोग करून कागदपत्रांचे व्यवस्थापन करणे सुलभ होईल असा विश्वास डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शान करताना व्यक्त केला.