गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा वनस्पतीशास्त्र विभाग आणि मुंबई विद्यापीठ, वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय वर्ष विज्ञान, वनस्पतीशास्त्र विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमावरील कार्यशाळा नुकतीच गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संपन्न झाली.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, मुंबई विद्यापीठ, वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य डॉ. स्मिता जाधव आणि लांजा महाविद्यालयाचे डॉ. राजेंद्र शेवडे, महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन उपस्थित होते.
कार्यशाळेच्या प्रारंभी पुलवामा येथील हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक डॉ. मंगल पटवर्धन यांनी केले. डॉ. स्मिता जाधव यांनी कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल विभाग आणि महाविद्यालयाचे अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सदर कार्यशाळेमुळे प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पना शिकविण्याचे कौशल्य प्राप्त होईल असे नमूद केले. महाविद्यालयाच्यावतीने डॉ. स्मिता जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाच्या भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी कार्यशाळेच्या प्रथम सत्रात ‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. शुभम पांचाळ यांनी ‘बायो इन्फर्मेटीक्स’ या विषयावर संवाद साधला. डॉ. अमित मिरगल आणि प्रा. म्हात्रे यांनी म्यापिंग आणि सिम्प्नन्स डायवरसिटी इंडेक्स या विषयावर,डॉ. मंगल पटवर्धन यांनी ‘प्लांट फिजिओलॉजी’ या विषयावर विषयावर मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेसाठी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २८ महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या ३७ प्राध्यापकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. शरद आपटे यांनी केले.