गोगटे जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त, रत्नागिरी आणि युजीसीचे नॅशनल फॅसिलिटी सेंटर ‘वेस्टर्न रिजनल इंस्ट्रुमेंटेशन सेन्टर, मुंबई’ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डिबिटी स्टार कॉलेज स्किम अंतर्गत दि. ५ ते ९ मार्च २०२४ दरम्यान महाविद्यालयात दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळा या महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्रयोगशाळा कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आल्या. प्रयोगशाळांतील उपकरणांची दुरुस्ती आणि देखभाल करण्याचे प्रशिक्षण ‘ओपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ लॅबोरेटरी इक्विपमेंट्स’ या कार्यशाळेद्वारे देण्यात आले. सदर कार्यशाळा ही महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे आयोजित करण्यात आली आणि त्या माध्यमातून प्रयोगशाळांतील अनेक उपकरणांची दुरुस्ती देखील करण्यात आली. महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे आयोजित कार्यशाळा ‘रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ कॉम्पुटर हार्डवेअर’ द्वारे संगणकाची दुरुस्ती आणि देखभाल करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि त्याद्वारे अनेक संगणकांची दुरुस्ती देखील करण्यात आली. वेस्टर्न रिजनल इंस्ट्रुमेंटेशन सेन्टर चे डेप्युटी रजिस्ट्रार एन. एन. राव यांच्याबरोबर वेस्टर्न रिजनल इंस्ट्रुमेंटेशन सेन्टर चे प्रख्यात प्रशिक्षक सुधीर कुमार, गोविंद चित्ते, मिलिंद शिद्रुक, मीनल ताम्हणकर, सरिता थोपटे, देवेन्द्र गुन्दे, मुसा ठाकुर यांनी सदर कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून काम पहिले.
या कार्यशाळांत महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांबरोबर इतर महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्रयोगशाळा कर्मचारी देखील सहभागी झाले. या दोन्ही कार्यशाळा वेस्टर्न रिजनल इंस्ट्रुमेंटेशन सेन्टरचे डायरेक्टर डॉ. शिवराम गर्जे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. पी . पी. कुलकर्णी, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. मिलिंद गोरे, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. भूषण ढाले यांच्या मार्गदर्शनाने आणि महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या संपन्न झाल्या.