विद्यार्थी युवकांना संसदीय आणि विधिमंडळीय कामकाजाची ओळख व्हावी, त्यांच्यातील वादविवाद, वक्तृत्व आणि नेतृत्व कौशल्य विकसित व्हावे, या हेतूने युवक बिरादरी (भारत) या संस्थेच्या वतीने मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय युवा संसदेत गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.जान्हवी जोशी हिने सहभागी होऊन उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.
युवक बिरादरी (भारत) ही महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून क्रांती शहा यांनी १९७४ मध्ये स्थापन केलेली मुंबईस्थित राष्ट्रीय पातळीवरील संस्था असून, तरुण वर्गात लोकशाही मूल्यांची रुजवणूक करणे, युवकांमधील सुप्त गुण विकसित करणे, सामाजिक आणि राष्ट्रीय बांधणीत तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठीयासंस्थेच्यामाध्यमातूनअभिरूप युवा संसद, युवा भूषण आणि स्मृती वाचन स्पर्धा, युवा शिबिरे, समुदाय विकास कार्यक्रम, पर्यावरण संरक्षण अशा विविध सामाजिक– शैक्षणिक –सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन देशभरात करण्यात येते.
जानेवारी २०२६ मध्ये राज्यशास्त्र विभाग आणि युवक बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय अभिरूप युवा संसद कार्यशाळा घेण्यात आली होती. दोन सत्रात पार पडलेल्या या कार्यशाळेत युवक बिरादरी (भारत) चे कार्यकारी समन्वयक अॅड. वेदांत माईणकर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय राजकीय व्यवस्था, संसदीय कार्यप्रणाली, संसदीय कामकाजातील संकल्पना यावर सैद्धांतिक स्वरुपात आणि संचालक प्रा. नागेंद्र राय यांनी विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून संसदीय कामकाजाचे सादरीकरण करून घेतले. या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी राज्य आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध समकालीन घडामोडींवर विचारमंथन केले. विद्यार्थ्यांना आयत्या वेळी देण्यात आलेल्या विषयावरील मतप्रदर्शनानंतर तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थी कु. ओंकार आठवले आणि कु. जान्हवी जोशी यांची पुढील फेरीकरिता निवड करण्यात आली. या दोन्ही विजेत्या स्पर्धकांना युवक बिरादरीच्या वतीने पाच हजार रुपयांचा धनादेश परितोषिक देऊन गौरव करण्यात आला होता.
प्राथमिक फेरीनंतर पार पडलेल्या विविध फेऱ्यांमधून कु. जान्हवी जोशी हिची महाराष्ट्रसह देशातील सुमारे दोन हजार स्पर्धकांमधून मुंबई येथील अंतिम फेरीसाठी २८ स्पर्धकांमध्ये निवड झाली होती. गुरुवार दि. १२ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या अंतिम राष्ट्रीय अभिरूप युवा संसदेततिने सहभागी होऊन सादरीकरण केले. या अंतिम फेरीत विद्यार्थांना चर्चेसाठी’सत्ता समतोल : केंद्र-राज्य संबंधांवर पुनर्विचार’, ‘कर्तव्य विधेयक- २०२६’ असे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, न्या. साधना गोरे (मुंबई उच्च न्यायालय), डॉ. राजन वेळूकर (माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ), प्रा. हुबनाथ पांडे, डॉ. मृदुल निळे, श्री. अविनाश सणस (उपायुक्त, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग) यांनी केले. याप्रसंगी तैपेई इकोनॉमिक अॅन्ड कल्चरल सेंटर, मुंबईचे उपसंचालक श्री. विलियम जे. एस. वांग यांची विशेष उपस्थिती होती. अंतिम स्पर्धेत पंजाबच्या होशियारपूर येथील दिव्या मेनन यांनी प्रथम क्रमांक, तर महाराष्ट्र राज्यातील सर्वेश नायक यांनी द्वितीय आणिमधु सिंग यांनी तृतीय क्रमांक पटकावला. जान्हवी जोशी हिला उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून रु.१०,००० (दहा हजार),अधिक प्रवासखर्च आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
तिच्या या यशाबद्दल र. ए.संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी अभिनंदन केले आहे. या स्पर्धेसाठी तिला डॉ. चित्रा गोस्वामी, प्रा. दत्त्तात्रय कांबळे, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. नीलेश पाटील, इतिहास विभागप्रमुख डॉ. पंकज घाटे आणि प्रा. मधुरा चव्हाण या शिक्षकांसह अनेक शिक्षकांचे आणि कु. मनस्वी नाटेकर, कु. मनस्वी बोरीकर, कु. ओंकार आठवले याविद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.
![]() |






Visitors Online : 1