![]() |
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते, राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक यांच्या जयंतीदिनानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी तर्फे दि. २३ जुलै २०२५ रोजी अभिवादन यात्रा काढण्यात आली. सलग विसाव्या वर्षी या यात्रेचे आयोजन करण्यात आले. प्रतिवर्षी दि. २३ जुलै रोजी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीदिनी महाविद्यालयाच्यावतीने लोकमान्य टिळक जन्मस्थान येथे अभिवादनपर कार्याक्रमाचे आयोजन करण्यात येते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार व पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर संस्कृत विभागातील वैभवी जोशी, पूर्वश्री जावडेकर, मधुश्री वझे, स्मितल बेंडे, ऋचा पाटील, वेदश्री बापट, हिमानी फाटक, चिन्मयी टिकेकर, पूर्वा खाडिलकर, चैतन्य अभ्यंकर, अक्षरा भट, कल्पजा जोगळेकर आणि कनक भिडे या विद्यार्थ्यांनी गीतेच्या १२ व्या अध्यायाचे पठण केले तसेच देशभक्तीपर गीत गायन केले. श्री. महेश सरदेसाई यांनी पारंपरिक वेशात लोकमान्यांची आरती केली.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ‘लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढयातील योगदान आणि कार्याचे स्मरण राहावे, म्हणून दरवर्षी या अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येते. रत्नागिरीचे सुपुत्र म्हणून असलेली लोकमान्य टिळकांची ओळख ही सौभाग्याची गोष्ट आहे. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा दाखला देताना ते म्हणाले की, टिळक समाजकारणी, राजकारणी, गणितज्ज्ञ, लेखक आणि संपादकही होते. त्यांनी स्वराज्यासाठी उभी केलेली चळवळ लक्षात घेऊन त्यांचे विचार आणि कार्याचा वारसा यांचे स्मरण ठेवून सुराज्यासाठी आपण वाटचाल केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
या कार्यक्रमात र. ए. सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे श्री. श्रीकांत भिडे, कार्यक्रम समितीप्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे, रत्नागिरीतील मान्यवर नागरीक आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, डी. एल. एल. ई. व संस्कृत विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुरातत्व खात्यातील अधिकारी, जोशी कुटुंबीय यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. मेघना म्हादये यांनी केले.







Visitors Online : 2