gogate-college-autonomous-updated-logo

‘नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स’ या शिष्टमंडळाची गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाला भेट – ‘विज्ञान संवादासाठी संयुक्त उपक्रमांचे नियोजन’

नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्सच्या (NCSC) वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नुकतीच गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान महाविद्यालय आणि संस्था यांच्यात विज्ञान प्रसार आणि शैक्षणिक उपक्रमांबाबत धोरणात्मक चर्चा करण्यात आली.

या महत्त्वपूर्ण बैठकीत विज्ञान संवाद (Science Communication), आगामी शैक्षणिक परिषदा आणि व्यावसायिक नेटवर्किंग या क्षेत्रांत परस्पर सहकार्यातून विविध प्रकल्प राबवण्यावर भर देण्यात आला. विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे उद्दिष्ट यावेळी निश्चित करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत भविष्यात संयुक्तपणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांचे आयोजन करणे, तसेच विद्यार्थ्यांना विज्ञानातील तज्ज्ञांशी जोडण्यासाठी नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून देणे यांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. या सहकार्यामुळे महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरणाला अधिक चालना मिळेल आणि विद्यार्थ्यांना विज्ञान प्रसाराच्या क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.

महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी शिष्टमंडळाचे पदाधिकारी श्री. सुहास नाईक-साटम व इतरांचे स्वागत केले. या प्रसंगी विज्ञान उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी व प्रा. बाबासाहेब सुतार उपस्थित होते. या उपक्रमाकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed.