gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी

गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील अनेक उपयुक्त अशा ग्रंथांचे प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. सदर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, ग्रंथालय समिती समन्वयक आणि कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सोनाली कदम, परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, प्रबंधक श्री. नंदकुमार गोळपकर, प्रा. रामा सरतापे प्रा. दिवाकर करवंजे, प्रा. निलेश पाटील, प्रा. दिलीप शिंगाडे, प्रा. दत्तात्रय वालावलकर तसेच विविध विभागांतील प्राध्यापक, अध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. ग्रंथपाल यांनी सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केल्यानंतर वाचक गटाचा विद्यार्थी कु. चारुदत्त भडसावळे याने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर प्राचार्य डॉ. साखळकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यानंतर उपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनसंदेशाचा आढावा घेतला. ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हा डॉ. आंबेडकर यांनी दिलेला खूप महान असा मंत्र असून तो सर्वकाळ सर्वांनी आचरणात आणला पाहिजे असा प्रभावी आहे. शिक्षण आणि संघर्ष या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून कोणत्याही क्षेत्रात सुयश प्राप्त करायचे असेल तर आपण हा मंत्र समोर ठेऊन काम केले पाहिजे; असे आवाहन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि थोर असे समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात; असे सांगून सर्वांना डॉ. आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

ग्रंथालयाच्या ‘भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम वाचन कक्षात’ आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनात भारतीय राज्य घटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आणि कार्य-कर्तृत्वावर आधारित विविध भाषांतील अनेक ग्रंथ प्रदर्शित करण्यात आले होते. सदर ग्रंथ प्रदर्शन वाचकांसाठी दोन दिवस खुले ठेवण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी केले. वाचक गटाचा विद्यार्थी कु. चारुदत्त भडसावळे याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उपस्थित सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments are closed.