भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्यसाधून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने दि. २७ एप्रिल रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय, रत्नागिरी येथील प्राचार्य डॉ. आशिष बर्वे यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
डॉ. बर्वे यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्याच्या वेळी असलेली सामाजिक,आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा मागोवा घेतला. त्या पार्श्वभूमीवर भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया समजावून सांगितली. अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून ३०० तज्ञांच्या संविधान सभेने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील ७ जणांच्या मसुदा समितीने २ वर्ष ११ महिने ७ दिवस प्रचंड कष्ट करून भारतीय संविधानाची निर्मिती केल्याचे डॉ. बर्वे यांनी अधोरेखित केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटना समिती समोरील भाषणातील अनेक दाखले त्यांनी दिले. बरोबरील व्यक्तींचा सन्मान करणे हे मोठ्या व्यक्तींच्या मोठेपणाचे गमक असते असे सांगत घटनासभेतील वादविवाद, दुरुस्ती यावर त्यांनी प्रकाश टाकला.संविधान निर्मितीच्या वेळी ७६३५ दुरुस्ती सुचविण्यात आल्या त्यापैकी २४७३ सुचना स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संविधानावरील टीकाकारांच्या टीकेस बाबासाहेबांनी दिलेली स्पष्ट उत्तरे डॉ. बर्वे यांनी श्रोत्यांसमोर मांडली.राष्ट्र प्रथम नंतर व्यक्तींचे अधिकार हे सूत्र बाबासाहेबांच्या विचार आणि कृतीच्या केंद्रस्थानी असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. बर्वे यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानातील कलम ३२ चा आशय स्पष्ट करत त्याचे महत्त्व अधोरेखित केले.मुलभूतअधिकाराचा आशय सांगत त्यावरील व्यावहारिक बंधनाचा उल्लेख त्यांनी केला. कायदा स्थिर,अपरिवर्तनीय झाला की त्याला डबक्याचे स्वरूप येते त्यासाठी संविधानातील ३६८व्या कलमाचा आधार घेत संविधानातील दुरुस्तीची तरतूद वक्त्यांनी समजावून सांगितली. ते पुढे म्हणाले की, संविधाविषयी बोलणे म्हणजे भारतीय नागरिकांनी स्वतःविषयी बोलणे होय.स्वातंत्र्याचा वापर देशहितासाठी करावा हीच संविधानकर्त्यांची अपेक्षा होती. शिक्षण, समान कामाला समान वेतन,महिलांचे अधिकार, कामगार कायदे यावर डॉ. बर्वे यांनी भाष्य केले. श्रद्धा आणि उपासना यातील फरक त्यांनी श्रोत्यांसमोर मांडला.आपल्या बरोबर इतरांनाही संविधानाच्या मार्गावर घेऊन जाऊ या. डॉ. आंबेडकरांचा नागरिकांवरील विश्वास आपण आपल्या वर्तनातून सार्थ करू या असे आवाहन त्यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय समारोपात कला शाखेच्या उप-प्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी प्रमुख वक्त्यांच्या मांडणीचा धागा पकडत बाबासाहेबांच्या अभ्यासू, समन्वयवादी भूमिकेवर प्रकाश टाकला, संविधान अधिकारांकडे कसे पाहावे हे शिकविते असे त्या म्हणाल्या. डॉ. आंबेडकरांची अभ्यासूवृत्ती अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, निबंध स्पर्धा समन्वयक डॉ. शाहू मधाळे, समारंभ समितीचे समन्वयक डॉ. तुळशीदास रोकडे, महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्तविक, वक्त्यांचा परिचय आणि आभारप्रदर्शन प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी केले.
![]() |
![]() |
![]() |








Visitors Online : 1