gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील डॉ. महेश बेळेकर आणि सौ. प्रतिभा कांबळे यांचा सदिच्छा समारंभ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील डॉ. महेश बेळेकर आणि सौ. प्रतिभा कांबळे यांचा सदिच्छा समारंभ संपन्न

र. ए. सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. महेश बेळेकर आणि त्याच विभागातील प्रयोगशाळा परिचर सौ. प्रतिभा कांबळे यांचा सेवानिवृत्तीपर सदिच्छा समारंभ महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला.

डॉ. महेश बेळेकर हे दि. २६ ऑगस्ट १९८६ मध्ये वरिष्ठ महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. ३७ वर्षांच्या शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी महाविद्यालयाने सोपविलेल्या विविध जबाबदाऱ्या उत्तमरीतीने पार पडल्या. आपल्या सेवानिवृत्तीपर शुभेच्छा समारंभाच्या सत्काराला उत्तर देताना डॉ. बेळेकरम्हणाले, विद्यार्थी दशेपासूनच मी या महाविद्यालयाशी जोडलो गेलो आहे. ‘विद्यार्थी असल्यापासूनच महाविद्यालयाचा मी आहे आणि महाविद्यालय माझे आहे’ याची जाणीव मला आहे. डॉ. महेश बेळेकर यांनी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मनापासून आभार व्यक्त केले. यानंतरच्या वाटचालीमध्ये पत्नीला विश्रांती, संगीत, हार्मोनियम, इलेक्ट्रॉनिक्स, ऑनलाईन माध्यमाचा वापर करून शिक्षण क्षेत्रात कार्य मनापासून करायचे असल्याचे सांगून, महाविद्यालयात करीत असलेल्या कामापेक्षाही जास्त काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

सौ. प्रतिभा प्रभाकर कांबळे महविद्यालयात १९९६ साली रुजू झाल्या. महाविद्यालयात नोकरी मिळण्यासाठी मदत करणाऱ्या प्रा. राणे मॅडम यांचे त्यांनी मनापासून आभार मानले व त्यांचे माझ्यावर अगणित उपकार असल्याचे त्यांनी सांगितले. घरामध्ये अनेक समस्या असून देखील महाविद्यालयात डॉ. महेश बेळेकर सरांनी, ऑफिस कर्मचारी, सर्व शिक्षकांनी त्यांना सांभाळून घेतले, याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

याप्रसंगी व्यासपीठावर र. ए. संस्थेचे सचिव श्री. सतीशजी शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य प्रा. डॉ. मकरंद साखळकर, सत्कारमूर्ती डॉ. महेश बेळेकर, सौ. प्रतिभा कांबळे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत गणित विभागप्रमुख डॉ. दिवाकर करवंजे यांनी केले.

भौतिकशास्त्र विभागातील डॉ. भूषण ढाले यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. त्यांनी डॉ. बेळेकर व प्रयोगशाळा परिचर सौ. कांबळे यांना सेवानिवृत्त समारंभासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. महेश बेळेकर यांना एक विद्यार्थी तसेच शिक्षक म्हणून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. रोटरी क्लब, रत्नागिरी तर्फे देखील उत्तम कामगिरीबद्दल गौरविण्यात आले आहे. डॉ. महेश बेळेकर यांनी संशोधनामध्ये देखील खूप योगदान दिले आहे. सरांनी अनेक लघु संशोधन प्रकल्प पूर्ण केले असून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय या दोन्ही स्तरांवर शोधनिबंध सादर केले आहेत. महाविद्यालयातील अनेक समित्यांमध्ये सरांनी समितीप्रमुख म्हणून काम पाहिले आहे. भौतिकशास्त्र विभागात अनेक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स एक्सपिरिमेंट मध्ये पॉवर सप्लाय लागतात त्या सरांनी स्वतः तयार केलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने मायक्रोप्रोसेसर युनिट, पॉवर सप्लाय सी. आर. ओ., इलेक्ट्रॉनिक सर्किट, महाविद्यालयाची तासासाठीची बेल इत्यादी उपकरणांचा समावेश आहे.

याप्रसंगी र. ए. संस्थेच्यावतीने सचिव श्री. सतीशजी शेवडे, महाविद्यालयाच्यावतीने प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने प्रा. अभ्यंकर कुलकर्णी आणि पतसंस्थेच्यावतीने सी. ए. प्रा. डॉ. अजिंक्य पिलणकर यांनी दोन्ही सत्कारमूर्तींचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी दोन्ही सत्कारमूर्तींच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, त्यांना दीर्घायुष्य मिळावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात र. ए. संस्थेचे सचिव श्री. सतीशजी शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर यांनी आपली मनोगते व्यक्त करून सत्कारमूर्तींना भावी आयुष्याच्या वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

आपले मनोगत व्यक्त करताना प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी म्हणाले, मी आणि प्रा. डॉ. महेश बेळेकर महाविद्यालयात एकाचा कालावधीत रुजू झालो. कित्येक वेळा आम्ही दोघेही ग्रंथालयात बसायचो व तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील करायचो. ‘ग्रंथालयात प्राध्यापक येतात म्हणून विद्यार्थी येतात’ असा संदेश देखील प्र. प्राचार्यांनी यावेळी उपस्थितांना देऊन दोन्ही सत्कारमूर्तींना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

यावेळी तिन्ही शाखेच्या उपप्राचार्या, विविध ठिकाणाहून आलेल्या डॉ. महेश बेळेकर आणि सौ. प्रतिभा कांबळे यांचा मित्रपरिवार, कुटुंबीय आदींसह वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. शिवाजी उकरंडे यांनी केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील डॉ. महेश बेळेकर आणि सौ. प्रतिभा कांबळे यांचा सदिच्छा समारंभ संपन्न गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील डॉ. महेश बेळेकर आणि सौ. प्रतिभा कांबळे यांचा सदिच्छा समारंभ संपन्न
Comments are closed.