दि. १२ ऑगस्ट हा दिवस भारतात ‘ग्रंथपाल दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. रंगनाथान यांची जयंती म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात मागासवर्गीय विद्यार्थी पुस्तकपेढीतील लाभार्थी विद्यार्थ्यांना पुस्तक संच वितरण आणि वाचक गटाचे उद्घाटन करुन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन श्री. किरण धांडोरे यांनी स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते डॉ. रंगनाथान यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी डॉ. एस. आर. रंगनाथान यांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या ग्रंथालयशास्त्रविषयक कार्याचा सविस्तर आढावा घेतला आणि ग्रंथपाल दिनाच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या. डॉ. रंगनाथान यांनी जगाला दिलेली ग्रंथालयाची पंचसूत्री आणि द्विबिंदू वर्गीरण पद्धती ही अमूल्य देणगी असून भारत सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला आहे याचा उल्लेख करून त्यांनी पुस्तकपेढी योजना, वाचक गट तसेच ग्रंथालयाच्या विविध विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचा विद्यार्थ्यांसमोर आढावा घेतला. त्यानंतर मागासवर्गीय पुस्तक पेढी योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वर्षभर अभ्यासण्याकरिता पुस्तक संच वितरीत करण्यात आले.
विद्यार्थी प्रातिनिधिक मनोगत म्हणून वाचक गटाच्या मनस्वी नाटेकर आणि ओंकार आठवले यांनी वाचनाविषयी तर सेजल वसावे आणि वैष्णवी श्रीनाथ यांनी पुस्तक पेढीच्या उपयुक्ततेविषयी उपस्थित विद्यार्थ्यांसमोर संवाद साधला.
महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. यास्मिन आवटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विद्यार्थी जीवनातील विविध अनुभवांचा दाखला देत ग्रंथालय आणि वाचन यांचे महत्व विषद केले. डॉ. रंगनाथान यांना परत एकदा वंदन करून त्यांनी आयुष्यभर ग्रंथालयांसाठी केलेले कार्य हे अत्युच्च असून आपण सर्व कायम त्यांचे ऋणी राहिले पाहिजे असे नमूद केले. महाविद्यालयीन ग्रंथालय अतिशय समृद्ध असून तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील सर्व सेवासुविधांचा विद्यार्थी जीवनात जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे असा सल्ला दिला.
त्यानंतर अभ्यासक्रमातून रद्दबातल केलेल्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. यास्मिन आवटे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर ग्रंथ प्रदर्शन प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासाठी असून अत्यल्प अशा स्वागत मूल्यात सदर पुस्तके वाचकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या कार्यक्रमाला वाचक गट, पुस्तक पेढी योजनेतील सहभागी विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन श्री. उत्पल वाकडे यांनी केले.