gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन

dr-ambedkar-jayanti-programme-held-at-gogate-college

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३१व्या जयंती दिनानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंती दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मनोगतात हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे तर जगातील द्रष्टे नेते होते. जगातील ज्या ज्या ठिकाणी ते शिक्षण घेण्यासाठी गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी नावलौकिक मिळविला. यावेळी डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या विविध पैलुंवर डॉ. मधाळे यांनी प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी कुलकर्णी होते. उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण क्षेत्रातील ज्ञानाचा प्रचंड ध्यास घेऊन अभ्यास केलेले एक व्यक्तिमत्व होय. त्यांनी निर्माण केलेली संविधानाची रचना, पायावर आज देश उभा आहे. त्यांचे विचार, चारित्र्य आणि चरित्र संपूर्ण समाजाला प्रेरणादायी, बोध घेण्यासारखे आहे. वंचित घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असून, जातीपातीच्या पुढे जाऊन त्यांनी भारताच्या जडणघडणीत आपले मोलाचे योगदान दिले आहे. आपण सर्वांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आदर्श घेऊन वाटचाल केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या परिपत्रकानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त महाविद्यालयात सामाजिक समता कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत व्याख्यान, निबंध स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन मागासवर्गीय विकास कक्षाच्या वतीने करण्यात आले. बुधवार दि. १३ एप्रिल, २०२२ रोजी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात बुधवार दि. २० एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य, प्राचार्य डॉ. बाळासाहेब साळवे यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक धोरण’ या विषयावरील व्याखानाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. तेजश्री भावे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, कनिष्ठ महाविद्यालयातील अध्यापक, विविध विभागप्रमुख, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, प्रबंधक श्री. रवींद्र केतकर आदि मान्यवर उपस्थित होते.

Comments are closed.