विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवज्ञान या अभ्यासक्रमातील उद्देशाने लघु उद्योग आणि उद्योजकता विकास, स्वयंरोजगार, महिला आर्थिक सक्षमीकरण, विकेंद्रितऔद्योगिक विकास व ग्रामीण विकास, बदलते शैक्षणिक आयाम, कौशल्याधारित शिक्षण या पार्श्वभूमीवर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांची गुहागर तालुक्यातील अभिषेक एंटरप्राईजच्या बटण निर्मिती उत्पादन विभाग वरवेली येथे नुकतीच शैक्षणिक क्षेत्र भेट देण्यात आली.
गारमेंट फॅशन अक्सेसरीज, ज्वेलरी, लेदर, शूज आणि बॅग या निर्मित उद्योगांसाठी लागणारी नाविन्यपूर्ण बटण निर्मिती अभिषेक एंटरप्राईजच्या वरवेली येथील उत्पादन विभागात केली जाते. बटण निर्मितीची प्रक्रिया, यंत्र सामग्री आणि बटणाचे विविध प्रकार या अनुषंगाने विद्यार्थांना प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभले. विद्यार्थांनी बटण तयार करण्याचे प्रात्यक्षिक पहिले तसेच विविध प्रकारची बटणे पाहण्याची संधी मिळाली. या क्षेत्रातील नव्याने येणाऱ्या रोजगाराच्या संधी यासंबधी माहिती मिळाली. या वेळी फॅक्टरी समन्वयक श्री. ज्ञानेश्वर झगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अभिषेक एंटरप्राइजचे उत्पादन विभागाचे व्यवस्थापक श्री. दीपक झगडे यांनी विद्यार्थ्यांशी अभ्यास साधत लघु उद्योग निर्मितीत जिल्हा उद्योग केंद्राची भूमिका, लघु उद्योगासाठी मिळणाऱ्या विविध शासकीय योजना व अर्थसहाय्य, महिला रोजगार निर्मिती, बटण निर्मितीच्या अनेक नाविन्यपूर्ण प्रकारांची माहिती विविध उदाहरणारसह दिली.
अर्थशास्त्र विषयाचा अभ्यासक्षेत्र भेट अभ्यास पद्धतीने करता यावा, सैद्धांतिक ज्ञान आणि उपयोजित ज्ञान यांच्यातील समन्वय विद्यार्थ्यांना उमजून यावा, औद्योगिक अर्थशास्त्राच्या अनुषंगाने असणाऱ्या रोजगार वस्वयंरोजगार संधी याची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी अशी विविध उद्दिष्ट्ये समोर ठेवून याभेटीचे नियोजन करण्यात आले होते.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कला शाखा उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रामा सरतापे, विभागातील सहकारी प्राध्यापक डॉ. दिनेश माश्रणकर, प्रा. सुर्यकांत माने यांनी या क्षेत्र भेटीचे नियोजन केले.
अर्थशास्त्र विभागातील तृतीय वर्ष व पदव्युत्तर पदवी विभागातील २९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्र अभ्यासातून अर्थशास्त्र विषयातील विविध संकल्पना आणि प्रत्यक्ष अध्ययनासाठी सहभाग नोंदवला. या सर्व विद्यार्थांनी या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यामुळे ज्या उद्देशाने ही क्षेत्र भेट आयोजित करण्यात आली होती ती साध्य झाली.