रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मराठी विभागाच्यावतीने ‘जीवन कौशल्य’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत डॉ. अपर्णा महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या कै. ज. शं. केळकर सभागृहात ही कार्यशाळा दि. २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत पार पडली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, कलाशाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, मार्गदर्शक डॉ. अपर्णा महाजन, मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे उपस्थित होते. त्यांनी मराठी विभाग नेहमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासानुवर्ती विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रास्ताविकात सांगितले.
कार्यक्रमाला शुभेच्छा देताना प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जीवन कौशल्ये अत्यंत आवश्यक आहेत. जीवन कौशल्ये आपल्याला अधिकाधिक विकसित करतात.
जीवन कौशल्य या तीन दिवसांच्या कार्यशाळेत मार्गदर्शक डॉ. अपर्णा महाजन यांनी ध्येयनिश्चिती, लेखन कौशल्य, संवाद कौशल्य देहबोली, मुलाखत कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन तसेच निरंतर विकास कसा साधायचा अशा विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सीमा वीर यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय डॉ. निधी पटवर्धन यांनी करून दिला. सदर कार्यशाळेत सर्व शाखांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेच्या आयोजनास ‘डी.एम.आर. हायड्रो’ या उद्योजक समूहाचे प्रायोजकत्व लाभले.