जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, रत्नागिरी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा ‘राष्ट्रीय मतदार दिन’ महाविद्यालयात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
नवमतदारांमध्ये मतदार प्रक्रियेसंदर्भात जनजागृती होऊन मतदान प्रक्रियेत त्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा, या हेतूने भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रतिवर्षी देशभरात दि. २५ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर विद्यमान वर्षी महाविद्यालयात जिल्हास्तरीय १२ व्या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री मा. श्री. उदय सामंत यांनी नवमतदारांना आभासी माध्यमाद्वारे मार्गदर्शन केले. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा पवित्र हक्क बहाल केला असून, मतदारांनी अधिक सजगपणे हा हक्क बजावला पाहिजे. भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून, भारतीय लोकशाहीची चर्चा विविध अंगांनी संपूर्ण जगभरात केली जाते. ती अधिकाधिक सक्षम करण्याची जबाबदारी नवमतदारांवर आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकांमध्ये मतदान करून मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी नवमतदारांना केले.
यानंतर गोगटे – जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनी घ्यावयाची शपथ दिली. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून, सशक्त, सुदृढ भारताच्या निर्मितीसाठी मतदानाच्या टक्केवारी वाढीबरोबरच उमेदवार निवड गुणवत्ताही वाढली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री. सुशील चंद्रा यांचा शुभ संदेश देणारी चित्रफित प्रदर्शित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मनोगतात उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. श्रीकांत गायकवाड यांनी उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनाची पार्श्वभूमी, तो साजरा करण्याचा प्रमुख उद्देश, निवडणूक प्रक्रिया, रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित करण्यात येणारे मतदान जनजागृती विषयक विविध कार्यक्रम यांची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात उपस्थितांना मागर्दर्शन करतानाअप्पर जिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे म्हणाले, मतदानाचा पवित्र हक्क बजाविण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या नावाची मतदारयादीत नोंदणी करून घेतली पाहिजे. एका मताची किंमत ही निवडणुकीत एका मताने हरलेल्या उमेदवाराला समजते. भारतात दिवसेंदिवस तरुण नवमतदारांच्या संख्येत वाढ होत असून, नवमतदारांनी निवडणुकीत सद्सदविवेक बुद्धीने आपल्या लोकप्रतिनिधीची निवडमतदानाच्या हक्काच्या माध्यमातून केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी नवमतदारांना केले.
याप्रसंगी नवमतदारांना प्रातिनिधिक स्वरुपात मतदार कार्डचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अनघा निकम यांनी तर आभारप्रदर्शन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांनी केले.
या कार्यक्रमाला तहसीलदार श्री. शशिकांत जाधव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, पनवेल विभागीय सहसंचालक डॉ. संजय जगताप, महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, आस्था सोशल फौंडेशनच्या सुरेखा पाथरे, शक्ती सेवा संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी माने, युथ आयकॉन संकेत चाळके आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता निवडणूक नायब तहसीलदार माधवी कांबळे, निवडणूक नायब तहसीलदार श्री. चव्हाण, तिन्ही शाखांचे उपप्राचार्य, प्रबंधक श्री. रवींद्र केतकर, श्री. प्रसाद गवाणकर, प्रा. प्रशांत लोंढे, श्री अमलेश तांबे,निवडणूक साक्षरता मंडळाचे समन्यवक प्रा. निलेश पाटील,निवडणूक शाखेतील आणि महाविद्यालयातील कर्मचारी, सेवक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला.