भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकार व आयुष मंत्रालय यांच्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठांतर्गत सलग्न महाविद्यालयांमध्ये ‘७५ कोटी सूर्यनमस्कार संकल्प’ दि. १ जानेवारी ते दि. ७ फेब्रुवारी २०२२ या काळात नियोजित करण्यात आला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातही हा उपक्रम नुकताच यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालय, जीजीपीएस, शिर्के हायस्कूल, सर्व गुरुकुल प्रकल्प, केळ्ये हायस्कूल, गोदुताई जांभेकर महिला विद्यालयातील विद्यार्थी आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी या उपक्रमात आपला सक्रीय सहभाग नोंदवला. तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील जिमखाना, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना (भूदल आणि नौदल), लाइफ लॉंग लर्निंग, वाणिज्य विभाग यातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी आणि सेवकवर्ग सहभागी झाले होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर सकाळी ७.०० वाजता सुमारे ८२० संख्येने एकत्र येत सुमारे २१००० सूर्यनमस्कार घातले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरीचे मान. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील उपस्थित होते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीम. विशाखा सकपाळ, एम.सी.व्ही.सी. विभागप्रमुख प्रा. श्रीकांत दुदगीकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. सोनाली कदम, गुरुकुलचे श्री. राजेश आयरे इ. व्यक्तींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. योगासनांचा मानवी शरीराला होणारा फायदा आणि योगासनांची आताच्या धावपळीच्या काळात किती गरज आणि आवश्यकता आहे हे विषद करून सदर उपक्रमाला आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी भारत सरकार आणि मुंबई विद्यापीठाच्या ‘७५ कोटी सूर्यनमस्कार’ या उपक्रमाची माहिती दिली आणि या संकल्पाला मानवी जीवनात किती महत्व आहे ते विषद केले.
मुंबई विद्यापीठाने रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयांतील ‘७५ कोटी सूर्यनमस्कार संकल्प’ या उपक्रमाचे जिल्हा समन्वयक म्हणून डॉ. विनोद शिंदे यांची नेमणूक केली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, जिमखाना समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, क्रीडासंचालक डॉ. विनोद शिंदे व सहकारी, तीनही विभागांचे उपप्राचार्य, प्राध्यापक, र. ए. सोसायटीअंतर्गत शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, सेवक यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोनाली कदम यांनी केले. अल्पोपहाराने या उपक्रमाची सांगता झाली.