जगभरात पर्यावरण या विषयी जागरुकता निर्माण झाली असून सर्व देश पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात संशोधनाच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. नव्या संशोधकांनी पर्यावरण पूरक संशोधन करण्याची गरज असल्याची मत डॉ. राजेंद्रकुमार सराफ यांनी व्यक्त केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पर्यावरण तज्ञ डॉ. राजेंद्र सराफ यांचे व्याख्यान नुकतेच संपन्न झाले त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विज्ञान मंडळाच्या वतीने पुणे येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सराफ यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम महाविद्यालयातील शास्त्र शाखेतील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आला होता.
डॉ. राजेंद्रकुमार सराफ यांनी आपल्या व्याख्यानात पर्यावरण पूरक संशोधनाच्या भारतीय विध्यार्थी आणि शास्त्रज्ञ यांना असलेल्या संधी याविषयी बोलताना पर्यावरणीय प्रभाव मुल्यांकन, कार्बन न्यूट्रॅलिटी (कार्बन उत्सर्जित करणे आणि कार्बन सिंकमधील वातावरणातील कार्बन शोषून घेणे यामध्ये संतुलन असणे), जीवन चक्र मुल्यांकन, भारतातील उपलब्ध पिण्याचे पाणी, त्याचे संवर्धन, शाश्वत जल व्यवस्थापन, जल असुरक्षा मूल्यांकन, जल विनियोग, घनकचरा व्यवस्थापन, शाश्वत जैव खाण व्यवस्थापन या विविध विषयांवर उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुलदत्त कुलकर्णी होते. प्रत्येक व्यक्तीला पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण झाली आहे, पण त्यांना शास्त्रीय दृष्टीने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. त्यासाठी शास्त्र शाखेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी पुढाकार घेतला पाहिजे,तसेच याविषयी संशोधन करण्यासाठी पुढे आले पाहिजेअसे मत डॉ कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वनश्री तांबे यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रा. गोडबोले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.