भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक आणि मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या दि. ९ ऑगस्ट या जयंतीदिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात वैविध्यपूर्ण ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. मंगल पटवर्धन, मराठी विभाग प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे आणि सहा. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या संपूर्ण जीवनकार्याची माहिती देताना सांगितले की, ‘गणित विषयातील एम.ए. ही पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी मद्रास विद्यापीठात गणित विषयाचे नामांकित प्राध्यापक होणाचा बहुमान प्राप्त केला. नंतर १९२३ मध्ये मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल म्हणून कार्यभार स्विकारला. द्विबिंदू वर्गीकरण पद्धती ही त्यांनी जगाला दिलेली मोठी देणगी आहे. ग्रंथालयशास्त्रातील जगप्रसिद्ध असलेले पाच सिद्धांत त्यांनी मांडले. ही पंचसूत्री आज भारतातील प्रत्येक ग्रंथालयात अवलंबली जाते. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.’ अशा डॉ. रंगनाथन यांच्या जीवनातील काही ठळक बाबी नमूद केल्या.
प्रमुख पाहुणे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयीन ग्रंथालयाच्या विद्यार्थीभिमुक असलेल्या विविध योजना, उपलब्ध सेवा सुविधा यांचा सविस्तर आढावा घेतला. महाविद्यालयीन ग्रंथालय हे विद्यार्थी वाचक केंद्रित असे अनेक उपक्रम वेळोवेळी आयोजित करत असते; या उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सदुपयोग करून घेण्याचे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.
सदर प्रदर्शनामध्ये ग्रंथालयशास्त्र, गणित, संदर्भ साहित्य, ई-बुक्स, टॉकिंग बुक्स इ. वाचन साहित्य प्रदर्शित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.