gogate-college-autonomous-updated-logo

गोदुताई जांभेकर विद्यालयात रंगला ‘कांदळवन जनजागृती व प्रदर्शन कार्यक्रम’

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील वनस्पतीशास्त्र विभागामार्फत विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात. जागतिक कांदळवन संवर्धन दिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील समृद्ध कांदळवन संपदेची माहिती शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने गोदुताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी येथे प्रथमच कांदळवन जनजागृती व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रम दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात वनस्पतीशास्त्र विभागातील द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे कांदळवन परिसंस्था, तिचे पर्यावरणीय महत्त्व तसेच रत्नागिरी परिसरातील स्थानिक कांदळवन प्रजातींची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विविध कांदळवन वनस्पतींचे प्रत्यक्ष नमुने, त्यांची पाने, फुले, फळे व शेंगा यांचे प्रदर्शन भरवून प्रत्येक प्रजातीची वैशिष्ट्ये समजावून सांगितली. शालेय विद्यार्थ्यांना या वनस्पती प्रत्यक्ष हाताळण्याची आणि त्यांचे निरीक्षण करण्याची संधी मिळाल्याने त्यांचा उत्साह विशेष वाढला. स्थानिक जैवविविधतेची ओळख होऊन विद्यार्थ्यांमध्ये कांदळवन संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. तारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कांदळवन परिसंस्थेचे पर्यावरणीय महत्त्व आणि तिचे संवर्धन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या प्रदर्शनास १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी भेट देऊन फलक, माहितीपत्रके आणि वनस्पतींच्या प्रत्यक्ष नमुन्यांद्वारे कांदळवन संपदेची माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री. वाघमोडे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वनस्पतीशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम व प्रा. शरद आपटे यांनी नियोजन केले. डॉ. विराज चाबके, श्री. परेश गुरव व सौ. प्रियंका शिंदे-अवेरे यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. तसेच गोदुताई जांभेकर विद्यालयाच्या श्रीम. लिंगायत तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Comments are closed.