गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे नुकतीच कै. व्ही. एस. कानिटकर व्याख्यानमालेचे चौथे पुष्प संपन्न झाले. महाविद्यालयाच्या गणित विभागाचे माजी प्रमुख कै. व्ही. एस. कानिटकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सदर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते.
विद्यामानवर्षी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या गणित विभागाचे माजी विभागप्रमुख असलेले डॉ. हरिहर कुंभोजकर यांनी व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफले. ‘मानवी ज्ञानाचे स्वरूप’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. त्यांनी त्रिकालाबाधित सत्याचे स्वरूप विषद करताना महाभारत, वेद यातील संदर्भ देत अत्यंत खेळीमेळीत व्याख्यान दिले. तत्त्वज्ञान आणि गणित या दोन विषयांची सांगड घालताना अनेक खुमासदार प्रसंग त्यांनी सांगितले. भारतीय तसेच पाश्चात्य संस्कृतीतील दाखले देऊन सत्य ही गृहीतके असतात असे सांगितले. मनुष्य सत्याचा शोध घेताना ज्ञानाचा मार्ग अवलंबतो आणि जेथून मिळेल तेथून कोणकोणत्या प्रकारे ज्ञान अर्जित कतरो हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पी.पी. कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ‘गणित विषय हा सर्वसमावेशक विषय आहे’; असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, गणित विभागाचे प्रमुख प्रा. डी. पी. कारवंजे, माजी विभागप्रमुख डॉ. अजीज पठाण, डॉ. राजीव सप्रे, डी.बी.जे. महाविद्यालय, चिपळूणचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांची आवर्जून उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. केतकी जोशी यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.