भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी तर्फे दि. २३ जुलै २०२४ जयंतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतिवर्षी दि. २३ जुलै रोजी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीदिनी महाविद्यालयाच्यावतीने लोकमान्य टिळक जन्मस्थान येथे अभिवादनपर कार्याक्रमाचे आयोजन करण्यात येते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार व पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर संस्कृत विभागातील विद्यार्थांनी गीतेच्या १२ व्या अध्यायाचे पठन केले तसेच देशभक्तीपर गीत गायन केले. श्री. महेश सरदेसाई यांनी पारंपरिक वेशात लोकमान्यांचीआरती केली.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ‘लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढयातील योगदान आणि कार्याचे स्मरण राहावे, म्हणून दरवर्षी या अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात टिळकांचे योगदान खूप मोठे असून लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरीत झाला ही आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. लोकमान्यांचे विचार आणि कार्याचा वारसा याचे स्मरण ठेवून आपण वाटचाल केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रखर बुद्धिमत्तेची स्मरण करून देणाऱ्या त्यांच्या जीवनातील काही आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमात र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, रत्नागिरीतील उद्योजक श्री. आनंद भिडे, कलाशाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, कार्यक्रम समितीप्रमुख प्रा. शिवाजी उकरंडे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, एन.एन.एस व एन.सी. सी.चे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पुरातत्व खाते, भिडे आणि जोशी कुटुंबीय यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. मेघना म्हादये यांनी केले. उद्योजक भिडे परिवाराकडून उपस्थितांसाठी मिठाईचे वाटप करण्यात आले.