gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘स्कूल कनेक्ट (NEP – कनेक्ट) या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन

रत्नागिरी : गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी संदर्भात ‘स्कूल कनेक्ट (NEP – कनेक्ट)’ या विषयावरील एकदिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४- २५ पासून राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे महाराष्ट्र शासनाने निश्चित केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP -20) च्या अंमलबजावणीमुळे होणाऱ्या विद्यार्थीपयोगी शैक्षणिक बदलांबाबत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सर्व अकृषी विद्यापीठांमधील महविद्यालयात स्कूल कनेक्ट (NEP – कनेक्ट) संपर्क अभियान शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मंगळवार, दि. २३ जानेवारी, २०२४ रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात सकाळी ११.०० ते ३.०० या वेळेत ही कार्यशाळा संपन्न होणार असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंबंधीच्या सुकाणू समितीचे प्रमुख व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी स्वत: कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या कार्यशाळेत प्र-कुलगुरू प्रा.डॉ. अजय भामरे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. सुनील पाटील, कोकण विभागाचे उच्च शिक्षण विभागीय सहसंचालक डॉ. संजय जगताप आदि मान्यवरदेखील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची पार्श्वभूमी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी, त्याची कार्यपद्धती आणि फलित, शिक्षण क्षेत्रात त्यामुळे होणारे आमूलाग्र बदल अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे. या कार्यशाळेत रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई विद्यापीठाशी संलग्नित क्लस्टर वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य आणि त्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेत केल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी घ्यावा, असे आवाहन गोगटे – जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

Comments are closed.