महाविद्यालयीन जीवनातील अभ्यासेतर उपक्रमामधील एक महत्वाचा आणि सर्वाधिक संधी उपलब्ध करून देणारा उपक्रम म्हणजे “राष्ट्रीय सेवा योजना”! गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे विद्यमान शैक्षणिक वर्षाच्या “राष्ट्रीय सेवा योजना” उपक्रमाचे उद्घाटन आणि उद्बोधन दि. १३ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आले. “राष्ट्रीय सेवा योजना” उपक्रमाच्या उद्बोधन वर्गात सर्व स्वयंसेवकांना प्रा. प्रभात कोकजे यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे गीत गाऊन व रोपट्यास पाणी घालून उद्बोधन वर्गाचा आरंभ करण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजनेची ध्येये आणि उद्दिष्टे सांगताना प्रा. प्रभात कोकजे यांनी नेतृत्व विकसन आणि स्वयंशिस्त या दोन घटकांवर विशेष भर दिला.राष्ट्रीयसेवा योजना विभागाची यंत्रणा, या उपक्रमांतर्गत राबवण्यात येणारे विविध कार्यक्रम करत असताना समाजात काही वेळा स्वयंसेवकांना निराशेचा नकारात्मक सूर ऐकायला मिळू शकतो. अशावेळी खचून न जाता सकारात्मक मानसिकता ठेवून आपले काम पूर्ण ताकदीने करावे असे ते म्हणाले. “राष्ट्रीय सेवा योजना” या उपक्रमाचा स्वयंसेवक म्हणजे फक्त १२० तास भरून काढण्यापुरताच मर्यादित नाही तर सतत २४ x ७ असा हा स्वयंसेवक आहे. आपण स्वत:विषयी बाळगून असलेल्या समजुती, प्रतिष्ठा बाजूला सारूनच आपल्या समाजाचं देणं फेडू शकू असे त्यांनी सांगितले. समाज बांधणी व राष्ट्र उभारणी यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे एक व्यासपीठ आहे.
“राष्ट्रीय सेवा योजना” विभागाचे बोधचिन्ह हे कोणार्कच्या सूर्यमंदिराचे चाक आहे म्हणजेच ते रथचक्र आहे. चक्र म्हणजे सतत गतिशीलता. आपले स्वयंसेवक हेसुद्धा सतत गतिशील राहून स्वतःचा आणि त्यायोगे समाजाचा विकास घडवून आणू शकतात. या बोधचिन्हात वापरलेले रंग लाल, निळा व पांढरा यांचेही महत्त्व त्यांनी सांगितले. लाल रंग हे तरूणांच्या धमन्यातून सळसळणाऱ्या रक्ताचे तर निळा रंग हे विशाल आकाशाचे प्रतीक आहे. आपल्या विकासाला आकाश हीच मर्यादा असेल हेच जणू हा निळा रंग सांगतो असे प्रमुख अथिती श्रीमती. शाझिया बुड्ये यांनी सांगितले. रथचक्राला असणारे आठ आरे हे अष्टोप्रहर कार्यरत राहण्याची प्रेरणा देतात. सूर्य जसा सतत सर्वांना ऊर्जा देत असतो त्याचप्रमाणे हे बोधचिन्ह प्रेरणा देत असतं असे शाझिया बुड्ये यांनी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी स्वयंसेवकांच्या अंगी असणारी प्रचंड उर्जा योग्य कामी लागली पाहिजे. नेतृत्व गुण अंगी बनवण्यासाठी “राष्ट्रीय सेवा योजना” उपक्रम हे एक उत्तम कार्यक्षेत्र ठरू शकेल असे त्यांनी सांगितले. स्वतःला ओळखा, स्वतःच्या मर्यादा, शक्ती, संधी ओळखा आणि कामाला सुरुवात करा तरच अपेक्षित शिखर गाठता येईल असेही त्यांनी सांगितले. स्वयंसेवकांनी काळजीपूर्वक कार्य करणे आवश्यक आहे, कामाचे नियोजन हे असलेच पाहिजे आणि याचा परिणाम म्हणून आपल्या महाविद्यालयास अनेक वेळा विद्यापीठ पातळीवर सन्मानित केले गेले आहे. स्वयंसेवक म्हणून आपली भूमिका ओळखून कार्य केले गेले पाहिजे असे मत मांडले.
नेतृत्व विकसनाविषयी बोलताना प्रा. प्रभात कोकजे यांनी स्वामी विवेकानंद यांचा दाखला दिला. समाजाची मानसिकता ओळखून त्याप्रमाणे काम करण्याची आवश्यकता त्यांनी आपल्या बोलण्यातून अधोरेखित केली. मनाचा प्रामाणिकपणा, निर्मळता आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर कोणत्याही संकटावर सहज मात करता येते असेही प्रा. प्रभात कोकजे यांनी सांगितले. पुराणातील कथा तसेच लहानपणापासून आपण ऐकत असलेल्या गोष्टी यांचे दाखले देत प्रा. कोकजे यांनी स्वतःचा शोध, नेतृत्व विकास, सामाजिक जाणिवा या सगळ्याविषयी स्वयंसेवकांना उद्बोधित केले. याच उद्बोधनात त्यांनी स्थानिक पातळीवरील रोजगार निर्मिती, शेती आणि व्यवसाय यांची सांगड याचाही एक धावता उल्लेख केला ज्याचा विद्यार्थ्यांना भविष्यात निश्चित उपयोग होऊ शकेल.
उद्बोधन वर्गात प्रा. कोकजे यांच्या व्यतिरिक्त डॉ. दानिश गनी यांनी व्यक्तिपेक्षा व्यवस्था श्रेष्ठ असून व्यवस्थाच व्यक्तीच्या विकासास मदत करते असे सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी युवाशक्तीची आवश्यकता आणि तिचे महत्त्वही विद्यार्थ्यांना पटवून दिले. डॉ. गनीयांनी “राष्ट्रीय सेवा योजना” उपक्रमातील आजी – माजी सर्व स्वयंसेवक म्हणजे एक कुटुंबच असून ह्या उपक्रमामुळे परस्पर सहकार्याची भावना वाढीस लागते आणि ऋणानुबंधांचे जतन व संवर्धन होते असे सांगितले.
या उद्बोधन वर्गाला महाविद्यालायचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रमुख वक्ते प्रा. प्रभात कोकजे, प्रमुख अथिती मेस्त्री हायस्कूल रत्नागिरी येथील श्रीमती. शाझिया बुड्ये, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. दानिश गनी, प्रा. सचिन सनगरे, प्रा. हर्षदा पटवर्धन, प्रा. उमा जोशी, विद्यार्थी प्रतिनिधी व राष्ट्रीय सेवा योजना विभागातले सर्व स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु. गिरिजा चितळे हिने केले.