गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागामार्फत दरवर्षी विविध कार्यक्रम राबविले जातात. त्यातीलच एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे प्रा. पी. एन.देशमुख स्मृती कार्यक्रम. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील भूतपूर्व विभागप्रमुख प्रा. पी. एन देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेली ८ वर्ष हा स्मृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. विद्यमान वर्षी दि. १७ फेब्रुवारी २०२६ या दिवशी या व्याख्यानमालेचे प्रमुख व्याख्याते डॉ. प्रताप नाईकवाडे; सहयोगी प्राध्यापक, एएसपी कॉलेज, देवरुख यांचे ‘रत्नागिरीतील जैवविविधता- आव्हाने आणि संधी’ या विषयी व्याख्यान संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम यांनी प्रा. पी. एन. देशमुख यांच्या कार्याचे आणि त्यांच्या महाविद्यालयातील कामगिरीची ओळख करून दिली. विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. जी. एस कुलकर्णी व डॉ. मंगल पटवर्धन यांनी काही मजेशीर आठवणीतून प्रा. पी. एन. देशमुख यांचा त्यांच्या सहकाऱ्यांवरती असलेला विश्वास आणि आत्मीयता यांचे दर्शन घडवणाऱ्या काही आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे परीक्षा विभागप्रमुख डॉ. विवेक भिडे यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने पावर पॉइंट प्रेझेंटेशन, पोस्टर, फोटोग्राफी तसेच रील मेकिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी डॉ. प्रताप नाईकवाडे यांनी ‘रत्नागिरीतल्या जैवविविधतेची ओळख करून देताना जैवविविधतेचे बदलते स्वरूप आणि या अनुषंगाने भविष्यात निर्माण होणाऱ्या करिअरसाठीच्या संधी’ विद्यार्थ्यांसमोर खुल्या केल्या. कार्यक्रमातील पाहुण्यांची ओळख डॉ. विराज चाबके यांनी करून दिली तर प्रा. प्रियांका शिंदे-अवेरे यांनी बक्षीस पात्र विजेते घोषित केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. शरद आपटे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. परेश गुरव यांनी केले.
![]() |

