गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेतील, खगोलशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने शरद संपात दिन (विषुवदिन) आज उत्साहात साजरा केला. या खगोलीय घटनेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे खगोलशास्त्रातील बारकावे समजून घेतले.
या उपक्रमासाठी पुणे येथील प्रा. उमेश चव्हाण हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विशेषत्वाने उपस्थित होते. प्रा. बाबासाहेब सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी शरद संपात दिनाचे महत्त्व विशद करणारी आकर्षक भित्तीपत्रके तयार केली होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी जमिनीवर सरळ काठी रोवून तिच्या सावलीच्या लांबीची अचूक नोंद घेतली. या सावलीच्या प्रयोगावरून मिळालेल्या निरीक्षणांच्या आधारे विद्यार्थ्यांनी गणिते करून रत्नागिरी शहराचे अक्षांश ९५ टक्क्यांपर्यंत अचूक मोजण्याचा यशस्वी प्रयोग केला.
याप्रसंगी खास दुर्बिणीद्वारे सुरक्षितरीत्या सूर्यनिरीक्षण करण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी सूर्याच्या पृष्ठभागावरील सौर डाग प्रत्यक्ष पाहिले. या कार्यक्रमाला भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. भूषण ढाले आणि डॉ. विवेक भिडे आदी मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मयुरेश तांबे व स्वरांगी म्हैस्कर या विद्यार्थ्यानी विशेष मेहनत घेतली.
पुस्तकी ज्ञानापलिकडे जाऊन विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या प्रत्यक्ष अनुभवजन्य आणि उपक्रमशील अभ्यासाचे विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विशेष कौतुक केले.





Visitors Online : 1