प्रतिवर्षी दि. ५ सप्टेंबर रोजी देशभरात ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा केला जातो. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आणि शिक्षकांनी समाजघडणीत दिलेल्या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. १९६२ मध्ये डॉ. राधाकृष्णन यांनी आपला वाढदिवस वैयक्तिक स्वरूपात साजरा न करता तो देशातील सर्व शिक्षकांना समर्पित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली.
विद्यार्थी आणि समाजाला आकार देणाऱ्या शिक्षकांचे कष्ट व मार्गदर्शनाची परतफेड करणे अशक्य असले, तरी या खास दिवशी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण मार्ग अवलंबलेजातात. या निमित्ताने गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयातील विज्ञान विभागातील पदव्युत्तर विज्ञान मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पदवीपूर्व मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग घेत एकअनोखा उपक्रम राबवला. महाविद्यालयातील सात विभागातील एम.एससी. भाग १ आणि २ मधील ८७ विद्यार्थ्यांनीथेट शिक्षकांची भूमिका स्वीकारत प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना अध्यापन केले. या निमित्ताने भूमिकांची अदलाबदल करून विद्यार्थ्याना एक दिवसाचे शिक्षक बनण्याची संधी मिळाली. एम.एससी. च्या विद्यार्थ्यांनी वर्गात जाऊन व्याख्याने दिली तसेच प्रयोगशाळेमध्ये प्रात्यक्षिक सत्रे घेतली. प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना क्लिष्ट वाटणारे विज्ञानाचे सिद्धांत अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमामुळे पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आपले ज्ञान इतरांसोबत वाटण्याची, अध्यापन कौशल्ये विकसित करण्याची तसेच एका शिक्षकाची जबाबदारी आणि अध्यापनातील आनंद अनुभवण्याची अनोखी संधी प्राप्त झाली. त्याचबरोबर पदवीपूर्व विद्यार्थ्यांनाही समवयस्कांकडून अधिक संवादी आणि सहभागपूर्ण शिक्षण घेण्याचा एक वेगळा अनुभव मिळाला.
सदर कार्यक्रमाच्या छोटेखानी सांगता समारंभाचे सूत्रसंचालन करताना प्रा. अनघा घारपुरे यांनी अधोरेखित केले की शिकणे आणि शिकवणे ही आयुष्यभर चालणारी क्रिया आहे. त्यामुळे या उपक्रमातून मिळालेल्या अनुभवाचा सर्वांना नक्कीच फायदा होईल. यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यानी आपले अनुभव व्यक्त केले. विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “अध्यापनातून ज्ञानाची देवाणघेवाण आणि अनुभवातून घडणारे उद्याचे शिक्षक यापेक्षा सुंदर शिक्षक दिन आणखी कसा साजरा होऊ शकतो” शिकवताना शिकणे, ज्ञान वाटताना माणुसकी जपणे आणि पुढच्या पिढीला प्रेरणा देणे असा शिक्षक दिनाचा खरा अर्थ या उपक्रमातून सुंदरपणे अधोरेखित झाला, असेही त्या म्हणाल्या.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजन व समन्वयासाठी प्रा. अनुजा घारपुरे आणि प्रा. रश्मी भावे यांचे त्यांनी विशेष आभार मानले. या अनोख्या उपक्रमाला अर्थपूर्ण आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व पदव्युत्तर विद्यार्थी, पदवीपूर्व विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग आणि पदव्युत्तर विज्ञान मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक करून त्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असे जाहीर केले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
![]() |
![]() |
![]() |










Visitors Online : 1