|
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या आर. पी. गोगटे कला व विज्ञान महाविद्यालय व आर. व्ही. जोगळेकर वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणाऱ्या सीएमए शमीम मेमन यांना मुंबई विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.) पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. त्यांनी “A Study of Financial Literacy of College Teachers in Goa” या विषयावर संशोधन पूर्ण केले आहे. त्यांना गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य सीएमए डॉ. मकरंद साखळकर यांनी संशोधनकार्यात मार्गदर्शक म्हणून काम केले आहे.
सीएमए शमीम मेमन या सध्या व्ही. एम. साळगावकर इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी एज्युकेशन, राया, गोवा येथे वित्तीय लेखाशास्त्र विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अध्यापनासोबतच त्या संशोधन, शैक्षणिक तसेच प्रशासकीय कार्यात सक्रियपणे सहभागी आहेत. आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिक्षण हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे व संशोधनाचे क्षेत्र आहे. त्यांच्या संशोधनामध्ये गोव्यातील महाविद्यालयीन शिक्षकांच्या आर्थिक साक्षरतेची पातळी, आर्थिक नियोजन आणि आर्थिक वर्तन यांचा अभ्यास करण्यात आला आहे. तसेच शिक्षकांच्या आर्थिक ज्ञानाचा निवृत्ती नियोजन, विमा नियोजन आणि कर नियोजनाशी असलेला संबंध तपासण्यात आला आहे. आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिक्षणामुळे शिक्षकांना त्यांच्या आर्थिक बाबींविषयी योग्य व माहितीच्या आधारे निर्णय घेण्यास मदत होते हे या संशोधनातून अधोरेखित करण्यात आले आहे. पीएच.डी. पदवी प्राप्त करणे हे सीएमए डॉ. शमीम मेमन यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि व्यावसायिक प्रवासातील महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.
या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल सीएमए शमीम मेमन यांचे र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे आणि पुढील शैक्षणिक, संशोधनात्मक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.







Visitors Online : 1