gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ७७वा भारतीय स्वातंत्र्यदिन विविधरंगी कार्यक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ७७वा भारतीय स्वातंत्र्यदिन विविधरंगी कार्यक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ७७वा भारतीय स्वातंत्र्यदिन विविधरंगी कार्यक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

सकाळी महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रा. डी. आर. वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाद्यवृंदावर राष्ट्रगीताची धून वाजवली. यानंतर प्र. प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थांना स्वातंत्र्यदिनी घ्यावयाची शपथ दिली. लेफ्टनंट प्रा. स्वामिनाथन भट्टर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी शानदार संचलन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट प्रा. दिलीप सरदेसाई यांनी केले.

यानंतर महाविद्यालयाच्यावतीने जवाहर क्रीडांगण-लोकमान्य टिळक ग्रंथालय-जयस्तंभ–मारुती मंदिर आणि पुन्हा महाविद्यालय यामार्गे तिरंगा झेंडा घेऊन काढण्यात आलेली मोटारसायकल रॅली हे या समारंभाचे विशेष आकर्षण ठरले. या रॅलीचे उद्घाटन र. ए. संस्थेचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी श्री. मंदार गाडगीळ, प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचा उस्फुर्त सहभाग या रॅलीत पाहायला मिळाला.

त्यानंतर मुख्य इमारतीत गणित विभागाच्या ‘Ancient Mathematicians’, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या ‘Chandrayan–3’, महिला विकास कक्षाच्या ‘आदर्श स्त्री आणि महिला सक्षमीकरण’ या विषयावरील ‘मिळून साऱ्याजणी’, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि ‘हर घर तिरंगा’ या थीमवर आधारित ‘समृद्ध भारत, सक्षम युवक’ आणि महाविद्यालय आणि आय.आय.टी., मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्थानिक पाणीपुरवठा व्यवस्था अभ्यास’ या विषयावरील प्रकल्पाधारित भित्तीपत्रकाचे अनावरण प्र. प्राचार्य आणि अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पात समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि भूगोल या विभागातील प्राध्यापक आणि विदयार्थ्यांचा सहभाग असून या संदर्भातील अहवाल रत्नागिरी जिल्हा परिषदेस सादर करण्यात आला आहे.

महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झालेल्या मुख्य समारंभात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक डॉ. मेघना म्हादये यांनी केले. त्यानंतर वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या अनुक्रमे ‘माध्यम’ आणि ‘मशाल’, महिला विकास कक्षाच्या‘ हृदयस्पंदन’या हस्तलिखितांचे, तर अर्थशास्त्र विभागाचा वार्षिक अंक ‘अर्थशोध’चे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी विविध क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून गुणगौरव करण्यात आला. तसेच महाविद्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव– २०२३ च्या स्मृती जतन करणाऱ्याफोटो अल्बमचे प्रकाशन करण्यात आले.

या समारंभाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी सर्वांनास्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन महाविद्यालय, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थी करीत असलेल्या विविध क्षेत्रातील नैपुण्याचा आढावा घेतला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जे नेते, वीर योद्धे यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांचा इतिहास, कार्याचे स्मरण आपण करणे आवश्यक आहे. २०४७ मध्ये देश स्वातंत्र्याचा शतक महोस्तव साजरा करणार असून, स्वातंत्र्यप्राप्तीपासून ते आजपर्यंत झालेली देशाची प्रगतिपथावरील वाटचाल, देशासमोरील आज असलेली विविध आव्हाने आणि त्यांचा सामना करण्यासाठी शिक्षण या क्षेत्राचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो यावर त्यांनी भाष्य केले. तसेच विद्यार्थांचे कलागुण आणि ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक कार्य केले पाहिजे, असेमत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या अनुक्रमे डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. यास्मिन आवटे, डॉ. अपर्णा कुलकर्णी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. चिंतामणी दामले, प्रा. सुनील गोसावी आदि मान्यवर उपस्थित होते. यानंतर सांस्कृतिक विभागाच्यावतीने देशभक्तीपर समूहगीतांचे सादरीकरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, अध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समारंभ समिती सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग, विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments are closed.