gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची ‘जीवक उद्यानास’ भेट

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागामार्फत विविध क्षेत्रभेटींचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांना पर्यावरण व सभोवतालच्या औषधी वनस्पतींची माहिती व्हावी व त्यातून संवर्धन व्हावं असा उद्देश समोर ठेवून विद्यमान वर्षी दि. १६ डिसेंबर रोजी जेएसडब्ल्यू समूहाच्या जयगड येथील जीवक उद्यान येथे क्षेत्रभेटिचे आयोजन करण्यात आले होते. या क्षेत्रभेटीसाठी प्रामुख्याने प्रथम वर्ष माहिती तंत्रज्ञान व कला शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जयगड येथील जेएसडब्ल्यू समूहाच्या सी एस आर विभागामार्फत मत्स्यपालन, रोपवाटिका तसेच कोकणातल्या औषधी वनस्पतींचे संवर्धन केले जाते. या संपूर्ण परिसरातील मत्स्यपालन प्रामुख्याने माशांतील विविध प्रजाती, माशांची प्रजनन क्रिया आणि त्यांचे संवर्धन करत अगदी छोट्याशा जागेत करता येण्याजोगी भाजीपाला तसेच फळबाग यांची शेती याबद्दल विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात जाणून घेतले. या संपूर्ण क्षेत्रभेटीदरम्यान सी एस आर विभागाच्या पर्यवेक्षिका सौ योगिता महाकाळ यांनी आपल्या कोकणातल्या या समृद्ध वनसंपदेचा तसेच मत्स्यसंपदेतून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणाऱ्या या शेतीपूरक, तसेच शाश्वत दर्शकांची विद्यार्थ्यांना माहिती करून दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना भेट म्हणून कोकणातल्या औषधी वनस्पती दिल्या. त्यानंतर जीवक उद्यानासंबंधी जाणून घेताना जीवक हे प्राचीन भारतातील एक महान वैद्य होते, जे बुद्ध आणि मगधचा राजा बिंबिसार यांचे वैयक्तिक चिकित्सक होते, बालरोगतज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि आयुर्वेद व शस्त्रक्रियेत निपुण असलेल्या या अद्भुत वैद्यकीय शल्यचिकित्सकांनी त्यांच्या वैद्यकीत वापरलेल्या सुमारे 63 वनस्पती या उद्यानात संवर्धित केल्या गेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने कदंब, अमालकी, श्वेतचंदन, वस, राळ, भ्रुंगराज, करंज, हरितकी अशा नानाविध औषधी वनस्पती आणि त्यांच्या उपयुक्ततेबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती मिळवली. सदर क्षेत्रभेटीस माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रा. श्रावणी केतकर तसेच प्रा. नेहा जोग यांनी विशेष सहकार्य केले. तसेच वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. परेश गुरव यांनी क्षेत्रभेटीचे नियोजन केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने मूल्यशिक्षण अभ्यासक्रम आणि ऐच्छिक विषय या विषयांतर्गत ही क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ.सोनाली कदम व माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. मेधा सहस्त्रबुद्धे यांच्या सहयोगाने ही क्षेत्रभेट यशस्वी झाली.

Comments are closed.